ठाणे- मागील आठवड्याभरात टोमॅटोच्या दरात दुप्पटीने वाढ झाली असून सध्या किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री ८० रुपये प्रति किलोने केली जात आहे. इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च, वाढता मजूरीचा खर्च आणि त्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी होत असून बाजारात टोमॅटोची आवक ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे त्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका अधिकाऱ्यांनी दिली.

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या टोमॅटोंची आवक पूणे तसेच सातारा जिल्ह्यातून होत आहे. परंतू, मागील काही दिवसांपासून बाजारात टोमॅटोची आवक घटली असून दिवसाला केवळ ५० ते ६० गाड्या दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, त्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. आठवड्याभरापूर्वी घाऊक बाजारात २० रुपये प्रति किलोने विकले जाणाऱ्या टोमॅटोंच्या दरात थेट दुपट्टीने वाढ झाली असून सद्यस्थितीला ५० रुपये प्रति किलोने टोमॅटो विक्री केले जात आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च महागला आहे. त्यात, उत्पादन करणाऱ्या मजुरांनीही मजुरीचे दर वाढविले आहेत. त्यामुळे अनेकांनी टोमॅटोच्या उत्पादन घेण्याचे कमी केले असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. त्यात, दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळेही पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अधिच उत्पादनात घट आणि त्यात तापमानाची भर पडत असल्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक रोडविल्याचे चित्र आहे. आठवड्याभरात बाजारात टोमॅटोची आवक ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. परंतू, किरकोळ बाजारात याचा फायदा घेऊन सर्रासपणे ग्राहकांच्या पैशांची लुट केली जात आहे. आठवड्याभरापूर्वी किरकोळ बाजारात ४० रुपये प्रति किलोने विक्री केले जाणारे टोमॅटो सध्या ८० रुपये प्रति किलोने विक्री केले जात आहेत. आधिच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली असतानाच आता, भाजीपालांचे दरही वधारत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

काही भाज्यांचे दरही महागले
मागील काही दिवसांपासून काही भाज्यांच्या दरातही पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या घाऊक बाजारात फरसबी १०० रुपये प्रति किलोने विक्री केली जात असून किरकोळ बाजारात फरसबीचे दर थेट १२० ते १५० रुपयांवर पोहोचले आहेत. तर, फ्लॉवर घाऊक बाजारात १६ रुपये प्रति किलोने विकला जात असून किरकोळ बाजारात ४० ते ६० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. घाऊक बाजारात ६० रुपये प्रति किलोने घेवडा विकला जात आहे. किरकोळ बाजारात घेवड्याची विक्री ८० ते ९० रुपये प्रति किलोने केली जात आहे.