खासगी कार्यक्रमांमुळे वाहतूक कोंडी

डोंबिवलीतील सांस्कृतिक जडणघडणींचे केंद्र मानल्या जाणाऱ्या प्रसिद्ध फडके मार्गात असलेल्या अप्पा दातार चौकात गेल्या काही काळापासून खासगी कार्यक्रमांच्या आयोजनाचा अक्षरश: ऊत आला आहे. रस्ते अडवून आयोजित करण्यात येत असलेल्या या कार्यक्रमांमुळे डोंबिवलीतील सुजाण नागरिकांमधून तीव्र नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे. रविवारी १९ जानेवारी रोजी या चौकात असाच एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे फडके मार्गालगत असलेल्या निमुळत्या रस्त्यांवर वाहतुकीची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

अप्पा दातार चौक हे डोंबिवलीमधील मोक्याचे ठिकाण आहे. दिवाळी, गुढी पाडवा यांसारख्या सणानिमित्ताने या चौकात मोठय़ा संख्येने डोंबिवलीकर जमा होतात. त्यामुळे या फडके मार्ग आणि अप्पा चौकाला डोंबिवलीच्या जडणघडणीत एकप्रकारचे सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर खासगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेल्या मंडप उभारणीपासून ते कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी शहरातील हा प्रमुख चौक कधी अडविला जाईल याचा नेम नसतो.त्यामुळे शहराच्या सांस्कृतिक केंद्राचे कौतुक थांबवा आणि आम्हाला होणाऱ्या त्रासाला आता आवर घाला, अशी मागणी डोंबिवलीतील सुजाण रहिवाशांकडून होऊ लागली आहे.

अप्पा दातार चौकाच्या जवळच स. वा. जोशी आणि स्वामी विवेकानंद, गोपाळनगर या दोन शाळा आहेत. शाळांच्या आसपासचा भाग शांतता क्षेत्रात येत असल्याने अप्पा दातार चौकात अशा मोठय़ा कार्यक्रमांना येथे परवानगी कशी दिली जाते, असा सवाल नागरिकांमार्फत उपस्थित केला जात आहे.

‘वाहतूक आणि पोलीस अधिकाऱ्याकडून परवानगी मिळाल्यानंतरच कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांना मंडप उभारण्याची परवानगी दिली जाते. कार्यक्रमांच्या मंडप बांधणीवरून होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासाविषयी नागरिकांकडून तक्रार करण्यात आल्यास संबंधित तक्रारींची दखल घेतली जाईल,’ असे  कल्याण-डोंबिवली ममहापालिका प्रभाग अधिकारी अमित पंडित यांनी सांगतले.

अप्पा दातार चौकात मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या कार्यक्रमांमुळे येथे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होते. बांबू लावून रस्ते अडवल्याने अनेकदा वाहने स्वत:च्या इमारतीपर्यंत वाहन नेणेदेखील कठीण होते. याशिवाय मोठय़ा आवाजात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचा त्रास होऊ लागला आहे.

– माधुरी भोसेकर, नागरिक,  डोंबिवली