अंबरनाथः चिखलोली येथील नव्याने सुरू झालेल्या चिखलोली कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथमवर्ग दंडाधिकारी यांच्या न्यायालयाच्या वकील संघटनेची २०२६-२८ या कार्यकाळासाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत बदलापुरचे प्रियेश जाधव यांचा विजय झाला आहे. तर उपाध्यक्षपदी संदीप पगारे आणि सचिव पदी सत्यम पिल्ले यांची निवड झाली आहे. नव्याने स्थापन झालेल्या या न्यायालयातील निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता होती.

उल्हासनगर येथील न्यायालयावरील भार कमी करण्यासाठी अंबरनाथ शहरात कनिष्ठ न्यायालयाची उभारणी करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. अखेर अंबरनाथ शहराच्या चिखलोली परिसरात कनिष्ठ न्यायालयाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर लोकार्पण रखडले होते. गेल्या वर्षात ९ ऑगस्ट रोजी या न्यायालयाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ न्यायाधिशांच्या उपस्थितीत संपन्न झाले. त्यानंतर येथे कामकाजाला सुरूवात झाली.

नव्यानेच स्थापन झालेल्या या न्यायालयात वकील संघटनांची निवडणूक घोषीत करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी दोन दिवसांपूर्वी मतदान झाले तर नुकतेच त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्साहात पार पडलेल्या या निवडणुकीत ऍड. प्रियेश जाधव यांचा अध्यक्षपदावर विजय झाला आहे. त्यांची ही निवड २०२६ – २८ या कार्यकाळासाठी असणार आहे.

त्यांच्यासह उपाध्यक्ष पदी संदीप पगारे, सचिव पदी सत्यम पिल्ले, सहसचिव पदी भूषण कोतेकर आणि खजिनदार पदी प्रवीण अटकळे तर सहखजिनदार पदी मंगेश वायले यांची निवड झाली आहे. यासह सदस्य पदासाठी स्मिता आमोदकर, निखिल शिंदे, अनिल पष्टे, अक्षय देसाई, मनिषा गवई (तायडे) यांची निवड झाली आहे. ग्रंथपाल पदासाठी विशाल बजाज हे एकतर्फी निवडून आले आहेत.
पहिल्याच निवडणुकीत मोठी उत्सुकता

अंबरनाथचे चिखलोली हे नवीन न्यायालय असल्याने येथे पहिल्यांदा होणाऱ्या वकील संघटनेच्या निवडणुकीबद्दल उत्सुकता होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत वकिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली तर ७९० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क पार पाडला. ज्येष्ठ वकील सतीश अत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.

प्रतिक्रियाः पहिल्याच निवडणुकीत वकीलांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. येथे वकिलांसाठी सुविधा, अद्ययावत ग्रंथालय उभारण्यासाठी प्रयत्नशील राहील. वकिलांच्या हितसंबंधांसाठी, न्यायालय, वकील आणि नागरिकांचे यांच्यातील चांगल्या संबंधांसाठी प्रयत्न करणार असून विधि विद्यार्थ्यांसह वकिलांसाठीही ज्येष्ठ विधिज्ञांच्या मार्गदर्शनासाठी पुढाकार घेणार आहे. – ऍड. प्रियेश जाधव, अध्यक्ष, अंबरनाथ चिखलोली न्यायालय वकील संघटना.