Premium

Video : टिटवाळ्याजवळील राया गावात ४३ टक्के गुण मिळविणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याची मिरवणूक

आई, वडिलांचे आशीर्वाद आणि मित्रांनी दिलेल्या पाठबळामुळे पीयूषने दहावीमध्ये ४३ टक्के गुण मिळविले.

Procession student 43 percent
टिटवाळ्याजवळील राया गावात ४३ टक्के गुण मिळविणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याची मिरवणूक (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

कल्याण – शहरी भागापेक्षा गाव, आदिवासी पाड्यात दहावी, बारावी पास होण्याचा विद्यार्थ्यांचा आनंद वेगळाच असतो. काही विद्यार्थी अभ्यास कमी आणि मित्र-परिवाराचा गोतावळाच मोठा. अभ्यासापेक्षा क्रिकेट, बैठका, बढाया, गावातील नेतेगिरीमध्ये अधिक रमतात. मग, अल्पबुद्धीला जेवढा झेपेल तेवढा अभ्यास करून एखाद्या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत काठावरचे गुण मिळविले तर त्या विद्यार्थ्यासह त्याच्या मित्र परिवाराचा आनंद गगनात मावेनासा होतो. मग, अशा विद्यार्थ्याचा गावात मोठा वाजत गाजत सन्मान मित्रांकडून केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशाच प्रकारचा सन्मान टिटवाळ्या जवळील राया गावात दहावीत ४३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या पीयूष चन्ने याचा त्याच्या मित्रांनी केला. या आनंद उत्सवात त्याचे वडीलही सहभागी झाले होते. चिरंजीव एवढे गुण मिळवेल असे वडिलांनाही वाटले नव्हते. पीयूष सामान्य कुटुंबातील रहिवासी. गावाजवळील शाळेत जाऊन तो शालेय शिक्षण पूर्ण करत होता. दहावीमध्ये असताना आपल्या क्षमतेप्रमाणे त्याने अभ्यास केला. फार नाही पण चांगल्या गुणांना पास होऊ, असा विश्वास पीयूषमध्ये होता. नियमितचा खेळ, सवंगड्यांबरोबर मौजमजा, अभ्यास असा पीयूषचा दिनक्रम होता. त्याच्या मित्रांनी परीक्षेपूर्वी त्याला तू चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होशील. काही काळजी करू नको. तू फक्त पास हो, आपण तुझे जंगी स्वागत आणि जंगी पार्टी करू, असा विश्वास दिला होता. आई, वडिलांचे आशीर्वाद आणि मित्रांनी दिलेल्या पाठबळामुळे पीयूषने दहावीमध्ये ४३ टक्के गुण मिळविले.

हेही वाचा – Maharashtra SSC Result: ३५ टक्के काठावर पास! ठाण्यातील विद्यार्थ्यांने सर्व विषयामध्ये मिळवले परफेक्ट ३५ गुण; म्हणाला, “मी पास..”

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात राहून, कोणत्याही खासगी शिकवणी, विशेष मार्गदर्शन न घेता पीयूषने मोठा टप्पा पार केल्याने त्याच्या मित्रांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपला मित्र ४३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला, हे गावकऱ्यांनापण कळले पाहिजे म्हणून तात्काळ पीयूषच्या मित्रांनी ढोलक-ताशांच्या गजरात त्याची मिरवणूक काढली. झेंडूच्या फुलांचा हार आणि कपाळी गुलाल लावण्यात आला. कडक उन्हाचा चटका असूनही त्याची पर्वा न करता गावातील बालके, मित्रगण नाचत, मौज करत पीयूषच्या मिरवणुकीत सहभागी झाली होती. पीयूष या आनंदात सहभागी झाला होता. या मिरवणुकीच्या निमित्ताने पीयूष दहावी पास झाला आणि आता तो महाविद्यालयात जाईल असा संदेश पीयूषच्या मित्रगणांनी ग्रामस्थांना दिला.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/06/WhatsApp-Video-2023-06-03-at-6.49.53-PM-1.mp4
व्हिडीओ – लोकसत्ता टीम

हेही वाचा – मीरा भाईंदर : उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचा उलगडा; चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

समाज माध्यमांवरील काही संदेशांमध्ये ४८.८० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचे ८० टक्के गुण मोठे लिहून मित्राने कसे ८० टक्के गुण मिळविले असा संदेश प्रसारीत करण्यात आला होता. या मित्राच्या अभिनंदन फलकावर मार्गदर्शक, प्रेरणास्थान, गुरुस्थानी असणाऱ्या आपल्या समवयस्क मित्रांच्या छब्या लावण्यात आल्या आहेत. १०० टक्के गुण मिळवून अल्पसंतुष्ट असणाऱ्या शहरी विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थी ३५ ते ४० टक्केचा टप्पा ओलांडला तरी संतुष्ट असतो, हेच समाज माध्यमातील दृश्यचित्रफितीवरून स्पष्ट झाले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 19:16 IST
Next Story
Maharashtra SSC Result: ३५ टक्के काठावर पास! ठाण्यातील विद्यार्थ्यांने सर्व विषयामध्ये मिळवले परफेक्ट ३५ गुण; म्हणाला, “मी पास..”