बांबूपासून बनवलेल्या राख्यांना मागणी; कातकरी महिलांना आर्थिक आधार

सागर नरेकर
बदलापूर : सण-उत्सवांच्या निमित्ताने शहरी भागात पर्यावरणाची हानी होत असल्याचे चित्र असताना ग्रामीण भागांतील महिला मात्र उद्य्ोगातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देताना दिसत आहेत. मुरबाड तालुक्यातील शेलारी कातकरी वाडीतील महिलांनी बांबू, दोऱ्यापासून आकर्षक राख्या बनवल्या आहेत. शहरी भागातील काही मंडळी या राख्यांची खरेदी करत असून त्यातून महिलांनाही आर्थिक आधार मिळत आहे. ‘घरोघरी उद्योग’ ही मोहीम या गावात काही सुज्ञ व्यक्तींनी सुरू केली असून त्यातून महिलांना रोजगार देण्याचा मानस आहे.

मुरबाड तालुक्यातील शेलारी येथील कातकरी वाडीतील महिलांसाठी ‘घरोघरी उद्योग’ मोहिमेद्वारे काही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. रक्षाबंधननिमित्ताने पर्यावरणस्नेही राख्या तयार करण्याचा उपक्रम या मोहिमेद्वारे हाती घेण्यात आला. त्यानुसार बांबू, धागे, कापड आणि रंगांचा वापर करून कातकरी वाडीतील महिलांनी राख्या तयार करण्याचे काम सुरू केले. संताजी घोरपडे आणि योगेश तेलवणे या दोघांनी राख्या तयार करण्याचे प्रशिक्षण कातकरी वाडीतील महिलांना दिले. १० ते १२ महिला आपापल्या वेळेनुसार एकत्र जमून राख्यांची निर्मिती करत आहेत.

गुलाबी वाडी म्हणून ही शेलारीची कातकरी वाडी ओळखली जाते. त्यामुळे गुलाबी वाडीच्या नावाने या राख्यांची विक्री केली जात आहे. पर्यावरण रक्षण, मुलींचे रक्षण असे संदेश या राख्यांवर देण्यात आले आहेत. साधी सोपी मांडणी, मण्यांच्या साहाय्याने केलेली सजावट आणि बाबूंचा साचा असे या राखीचे स्वरूप आहे. या राखीची किंमत ५ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत आहे. सध्याच्या घडीला ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह जिल्ह्य़ातील काही मान्यवरांना या राख्या भेट देण्यात आल्या असून मागणीनुसार या राख्यांची विक्री केली जात असल्याची माहिती प्रकल्पाचे समन्वयक योगेंद्र बांगर यांनी दिली.

बारकाईने निर्मितीचे काम

बांबू सोलून त्याचे सुटे भाग करून त्यापासून बारकाईने राख्या तयार करण्याचे काम केले जाते. एक राखी तयार करण्यासाठी किमान तीन ते चार तासांचा वेळ लागतो. सर्व प्रक्रिया कोणत्याही यंत्राशिवाय हाताने केली जाते. त्यामुळे राखीचे मोल अधिक वाढते.

राख्यांच्या निर्मितीमुळे घरबसल्या एखादे काम हाती लागले आहे. पर्यावरणपूरक राख्या तयार करत असल्याचे समाधान आहे. याचा आर्थिक फायदाही होत आहे.

– मनीषा काळूराम वाघ, शेलारी कातकरी वाडी.