रोशनी खोत

राजकीय पक्षांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांमध्ये टाळेबंदीचे नियम डावलले जात असल्याचे निदर्शनास आल्याने कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने अशी शिबिरे भरवू नका, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. पालिकेने जाहीर केलेल्या पाच रक्त पेढय़ांमध्येच या पुढे रक्तदान केले जावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

टाळेबंदीमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केल्यानंतर कल्याण-डोंबिवली शहरात विविध राजकीय पक्षांतील काही उत्साही नेत्यांनी रक्तदान शिबिरे भरवली होती. मात्र, त्यांत सामाजिक अंतर राखले गेले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने राजकीय रक्तदान शिबिरे घेऊ नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

सध्या राज्यात काही दिवस पुरेल इतकेच रक्त साठा शिल्लक आहे. तो वाढावा यासाठी शासनाने नागरिकांना रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले होते. यानंतर काही उत्साही राजकारण्यांच्या शिबिरांपैकी अनेक ठिकाणी रक्तदान करताना गर्दी करण्यात आली. यात सामाजिक अंतर पाळण्यात आले नसल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

त्यातून विषाणू संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन पालिकेने राजकीय पक्षांना रक्तदान शिबिरे घेण्यास मनाई केली आहे.

तसेच इच्छुक रक्तदात्यांनी शहरातील संकल्प, अपर्ण, प्लाझ्मा, चिदानंद आणि सेवा या पाच रक्तपेढय़ांमध्ये जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे.

‘राजकीय पक्षाचा फलक नाही’

*  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून येत्या २५ मे रोजी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. याबाबत मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष मनोज घरत म्हणाले, की मुंबईतील काही पेढय़ांमध्ये रक्ताची कमतरता आहे. टाळेबंदीच्या काळात नागरिक रक्तदान करण्यासाठी बाहेर पडत नाहीत. त्यामुळे आम्ही पुढाकार घेत आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाचा फलक न वापरता हे शिबीर घेण्यात येणार आहे.

* रुग्णाला रक्ताची कमतरता जाणवणार नसून सर्वच कोविड रुग्णालयांतील रक्ताच्या मागणीवर आणि उपलब्ध साठय़ावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालिका सचिव संजय जाधव यांच्यावर आहे.