scorecardresearch

ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात मनाई आदेश जारी ; जिल्ह्यात १०६ सार्वजनिक तर ३४४ खासगी दहीहंडी

मागील दोन वर्षापासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यावर राज्य शासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले होते.

ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात मनाई आदेश जारी ; जिल्ह्यात १०६ सार्वजनिक तर ३४४ खासगी दहीहंडी
संग्रहित छायाचित्र

* उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेश

ठाणे – ठाणे जिल्ह्यात उद्या १९ ऑगस्ट रोजी १०६ सार्वजनिक आणि ३४४ खासगी दहीहंडी बांधण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान जनजीवन सुरळीत राहावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नागरिकांना कोणतेही शस्त्र बाळगण्यास, सामाजिक सुरक्षितता धोक्यात येईल अशा पद्धतीची भाषणे देण्यास यांसारख्या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे. मागील दोन वर्षापासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यावर राज्य शासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले होते.

यंदा परिस्थिती सामान्य असल्याने तसेच राज्य शासनाने उत्सवावरील निर्बंध हटविल्याने जिल्ह्यात सर्वत्र दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव सुरळीतरित्या पार पडावा आणि या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काही मनाई आदेश लागू केले आले आहे. या आदेशानुसार नागरिकांना  शस्त्रे, तलवारी, भाले, बंदूका,काठया, अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी  कोणतीही वस्तू बाळगणे. कोणताही  स्फोटक पदार्थ बरोबर बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच  कोणत्याही व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, सामाजिक  सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे देणे  हावभाव करणे, सोंग आणणे या गोष्टींना देखील मनाई लागू करण्यात आली आहे. तर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन आयोजित करण्यात आलेल्या सभा, उत्सव यांना हे आदेश लागू राहणार नसल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.