महापालिका क्षेत्रातील पाचशे चौरस फुटाच्या करांच्या मालमत्ता करातील सामान्य कर माफ करण्यात आला असतानाच, त्यापाठोपाठ आता यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या आणि दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर एकत्रित भरणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेने सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार १६ जूनपर्यंत कराचा भारणा केल्यास दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणर आहे. तसेच १६ ते ३० जूनपर्यंत ४ टक्के, १ ते ३१ जुलैपर्यंत ३ टक्के आणि १ ते ३१ ऑगस्टपर्यंत कर जमा केल्यास २ टक्के सवलत देण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेकडून दरवर्षी मालमत्ता कराची आकरणी करण्यात येते. पहिली आणि दुसरी सहामाही अशी दोन कराची देयके नागरिकांना देण्यात येतात. पालिकेने नुकतेच यंदाच्या मालमत्ता करांची देयके मालमत्ताधारकांना दिली आहेत. या देयकांचा एकत्रित भारणा करणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेने वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पहिल्या आणि दुसऱ्या सहामाहीचा एकत्रित कर ठरवून दिलेल्या मुदतीत भरणाऱ्या नागरिकांना दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात सवलत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे, यासाठी प्रभाग समितीमधील कर संकलन केंद्रे शनिवार, २८ मे रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ यावेळेत तर रविवार, २९ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० यावेळेत सुरु ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या कोणत्याही प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील करदाते त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही कर संकलन केंद्रावर रोख, धनादेश, धनाकर्ष तसेच डेबीट कार्ड, एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डद्वारे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत जमा करु शकतील, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.