नव्या आर्थिक वर्षांत ठाणेकरांच्या मालमत्ता करात तब्बल १० टक्के वाढीचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला असून, येत्या मंगळवारी मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात यासंबंधीची तरतूद करण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. सात महिन्यांपूर्वी मलनिस्सारण करात वाढ करून ठाणेकरांवर वाढीव करआकारणी झाली होती. या वाढीच्या दुसऱ्या टप्प्यात सामान्य करात वाढ होणार आहे. यामुळे रहिवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही करांमध्ये घसघशीत वाढीची शक्यता आहे.
राजकीय दबाव आणि बोटचेप्या प्रशासकीय धोरणांमुळे गेल्या दहा वर्षांपासून ठाणेकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ लादण्यात आली नव्हती. महापालिकेच्या उत्पन्नावर त्याचा होणारा प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन आयुक्तांनी वर्षभरापूर्वी मालमत्ता कर, पाणीपट्टी वाढीचा निर्णय घेतला. याशिवाय ठाणेकरांवर कचरा कराची आकारणीही करण्यात आली. हे करवाढीचे प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने सुरुवातीला स्थगित ठेवले खरे, मात्र नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांची धामधूम संपताच ते मंजूर करण्यात आले. या पाश्र्वभूमीवर येत्या मंगळवारी सादर होणाऱ्या नव्या वर्षांच्या अर्थसंकल्पात आयुक्त जयस्वाल यांनी ठाणेकरांच्या मालमत्ता करात पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
१० टक्क्यांची वाढ
राज्य सरकारच्या बंधनानंतरही ठाणे शहरात अजूनही मालमत्तांच्या भाडेमूल्यावर ठरावीक दराने मालमत्ता कराची आकारणी केली जाते. ठाणे महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ९६ कोटी रुपये जमा होतात. यापैकी सुमारे ४६ कोटी रुपयांचे उत्पन्न व्यावसायिक मत्ताधारकांकडून गोळा केले जाते. सद्य:स्थितीत ठाणे महापालिकेकडून निवासी मालमत्तांसाठी करयोग्य मूल्यावर ६२ टक्के, तर व्यावसायिक मालमत्तांना ११७ टक्के इतका मालमत्ता कर आकारला जातो. यापैकी सामान्य कराची टक्केवारी अनुक्रमे २६ आणि ३८ अशी आहे. येत्या आर्थिक वर्षांत रहिवासी आणि व्यावसायिक मालमत्तांना आकारल्या जाणाऱ्या सामान्य करात तब्बल १० टक्के वाढीचा प्रस्ताव आहे.