ठाणे : येथील बाळकुम भागातील म्हाडाच्या इमारतीतील घरांचा ताबा रहिवाशांना एक ते दिड वर्षांपुर्वी देण्यात आला. परंतु या इमारतीमधील सदनिकांच्या मालमत्ता कराची आधीपासूनची देयके रहिवाशांना पालिकेने पाठविली. लाखो रुपयांमुळे रहिवाशी संतप्त झाले होते. या रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली होती. दरम्यान, म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांची केलेल्या चर्चेनंतर ही देयके मागे घेण्यात आल्याचा दावा केळकर यांनी केला आहे.

ठाणे येथील बाळकुम भागात म्हाडाची इमारत आहे. या इमारतीमधील रहिवाशांना एक ते दिड वर्षांपुर्वी सदनिकांचा ताबा देण्यात आला. परंतु म्हाडा आणि महापालिकेतील वादात म्हाडा रहिवाशांसमोर आर्थिक भुर्दंडाचे संकट उभे राहिले होते. त्यांना लाखो रुपयांची मालमत्ता कर देयके पालिकेने पाठविली होती. या देयकांमुळे रहिवाशांमधून संताप व्यक्त होत होता. या रहिवाशांनी भाजपच्या खोपट येथील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उपस्थिती लावून आमदार संजय केळकर यांची भेट घेतली होती. म्हाडा आणि महापालिका यांच्यातील वादामुळे म्हाडा रहिवाशांना लाखोंची मालमत्ता कर देयके आली होती.

त्यामुळे रहिवाशांसमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. वास्तविक म्हाडाने हे पैसे भरणे बंधनकारक आहे. परंतु म्हाडाचे पैसे ठाणे महापालिका देणे लागते असून पालिका ते पैसे देत नाही. या म्हाडा आणि पालिका यांच्यात वादात रहिवाशी भरडले गेले. म्हाडा पैसे देत नाही म्हणून महापालिकेने लाखोंची मालत्ता कराची देयके पाठवून रहिवाशांना वेठीस धरले होते. याबाबत रहिवाशांनी ही बाब माझ्या कानावर टाकल्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी रहिवाशांना यापुढे देयके पाठवणार नसल्याचेही अधिकाऱ्यांनी कबुल केले, असा दावा केळकर यांनी केला.