२७३ कोटी जमा; गेल्या वर्षीपेक्षा २५ कोटी रुपयांची वाढ

वर्षभरापूर्वी आर्थिक चणचणीमुळे कर्मचाऱ्यांचे पगार देताना नाकीनऊ आलेल्या ठाणे महापालिकेने वर्षभरात मालमत्ता कर वसुलीत आघाडी घेतल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे. ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांतून महापालिका प्रशासनाने यंदा सुमारे २७३ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत मालमत्ता कर वसुलीत तब्बल २५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

मालमत्ता कराची सर्वात जास्त वसुली माजिवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात झाली आहे, तर सर्वात कमी वसुली कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात झाली आहे. दरवर्षी मालमत्ता कराच्या वसुलीत पिछाडीवर असणाऱ्या मुंब्रा भागात यंदा दोन कोटी रुपयांनी अधिक वसुली झाली आहे. कर वसुलीसाठी वर्षभर केलेल्या प्रयत्नांचे हे यश असून त्यामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्याचे चित्र आहे. कोपरी भागात सर्वात कमी वसुली झाली असली तरी ठरवून दिलेल्या लक्ष्यांकापेक्षा अधिक वसुली करण्यात या भागातील अधिकाऱ्यांना यश आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून जमा-खर्चाचे गणित बिघडल्यामुळे कोलमडलेली महापालिकेची आर्थिक स्थिती रुळावर आणण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्तासह विविध करांच्या वसुलीवर अधिक भर देण्यास सुरुवात केली होती. तसेच वर्षांनुवर्षे मालमत्ता कर भरण्यास ठेंगा दाखविणाऱ्या थकबाकीदारांना वठणीवर आणण्यासाठी बँडबाजा मोहीम हाती घेतली होती. यामध्ये थकबाकीदारांच्या घरी कर वसुलीसाठी बँडबाजा नेण्यात येत होता. याशिवाय, थकबाकीदारांच्या यादीचे फलक भर चौकात लावण्यात आले होते. परिणामी, महापालिकेच्या मालमत्ता करात यंदा विक्रमी वसुली झाल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांतर्गत शहरातून मालमत्ता कराची वसुली करण्यात आली असून त्यामुळे महापालिकेच्या यंदा मालमत्ता करातून २७३.३० कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यापैकी २४० कोटी रुपये यंदाच्या वर्षांतील तर ३२ कोटी रुपये मागील वर्षांचे आहेत. गेल्या वर्षी महापालिकेने २४७.५५ कोटी रुपयांची वसुली केली होती. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता करात २५ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.