प्रेषित मोहम्मद यांच्यासंबंधी एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांना नुकतेच भिवंडी पोलिसांनी समन्स बजावले होते. त्यानुसार त्यांना आज पोलीस ठाण्यात जबाबासाठी हजर राहावे लागणार होते. यावर नुपूर शर्मा यांनी आणखी चार आठवड्यांची मुदत पोलिसांकडे मागितली आहे. रविवारी रात्री उशीरा नुपूर शर्मा यांनी वकिलांमार्फत भिवंडी पोलिसांकडे ई-मेलद्वारे ही मुदत मागितली आहे. नुपूर शर्मा यांना मुदत द्यायची का, याबद्दल पोलिसांनी अद्याप निर्णय घेतला नाही

नुपूर शर्मा या भाजपच्या प्रवक्ता असताना त्यांना २७ मे या दिवशी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात बोलविण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात एक आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्याविरोधात मुंबई, ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह विधानानंतर शर्मा यांना भाजपामधून निलंबित करण्यात आले आहे.

नूपुर शर्मा यांच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यातही मुस्लिम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात त्यांना भिवंडी शहर पोलिसांनी समन्स बजावून त्यांना सोमवारी म्हणजेच, आज जबाबासाठी हजर राहण्यास सांगितले होते. रविवारी शर्मा यांनी याबाबत आणखी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे. शर्मा यांच्या वकिलांनी त्यासंदर्भाचा ई-मेल पोलिसांना पाठविलेला आहे. पोलिसांनी मुदत वाढीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नव्हता.