विक्री करण्याचा सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव

ठाणे : महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानाने बसगाड्या नसल्याने पुरेशी प्रवासी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या ठाणे परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) ताफ्यातील ५१७ पैकी २३७ बसगाड्या भंगार झाल्याची बाब समोर आली आहे. या बसगाड्या भंगारात विक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केला आहे.

ठाणे महापालिकेच्या ताफ्यात एकूण ५१७ बसगाड्या आहेत. त्यातील २४० बस जीसीसी तत्त्वावर ठेकेदारामार्फत चालविण्यात येत आहेत. उर्वरित परिवहन सेवेमार्फत चालविण्यात येणाऱ्या २७७ बसगाड्यांपैकी १२४ बसगाड्या वापरण्यायोग्य आहेत. तर उर्वरित १५३ बसगाड्या नादुरुस्त आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी प्रती बस सरासरी १५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या बसगाड्या १० वर्षे व त्यापेक्षा जास्त आयुर्मान झाले असल्याने बसगाड्याची घसारा किंमत, दुरुस्तीसाठी लागणारा खर्च, वार्षिक निगा व देखभाल खर्च, बीएस-३  नामांकनाच्या बसगाड्या कालबाहय झाल्याने सुट्या भागांची उपलब्धता सहजासहजी होत नाही. तसेच खर्चाची सांगड घालणे शक्य होत नाही. त्यामुळे या बसगाड्या भंगारात काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वापरायोग्य असलेल्या १२४ बसगाड्यांमधील आयुर्मानाच्या ८४ बसगाड्यामध्ये मोठे खर्चीक काम निघाल्यास या बसगाड्याही टप्याटप्याने वापरास योग्य राहणार नाहीत. त्यामुळे त्या बसही भंगारात काढाव्या लागणार आहेत. मोठ्या दुरुस्तीच्या १५३ बसगाड्या तसेच ८४ बसगाड्या अशा एकूण २३७ बसगाड्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत बसगाड्या भंगारात काढण्याचा दाखला प्राप्त करण्याची कारवाई करावी लागणार आहे. तसेच १५३ बसगाड्यांपैकी १४ बसगाड्यांचे किलोमीटर दोन लाखांपेक्षाही कमी आहे. पंरतु या बसगाड्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करावी लागणार असून सुटेभाग व निधीअभावी दुरुस्त झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या वापरण्यात येत नाहीत. बसगाड्यांचे सुटेभाग व इतर साहित्य इतर लहान दुरुस्तीच्या बसगाड्यांना वापरून त्या बसगाड्या संचलनास उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मोठ्या दुरुस्तीच्या १५३ बसगाड्या तसेच ८४ बसगाड्या अशा एकूण २३७ बसगाड्या भंगारात विक्री करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार आहे.