चिंचोटी, तुंगारेश्वर येथे दुर्घटना टाळण्यासाठी वनविभाग सज्ज

वसई : चिंचोटी आणि तुंगारेश्वर येथील धबधब्यांच्या ठिकाणी दरवर्षी पावसाळय़ात दुर्घटना घडतात. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेसंदर्भात विविध उपाययोजना करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी कमी व्हावी यासाठी या ठिकाणी संरक्षण जाळय़ा लावण्यात आल्या आहेत. तसेच जागोजागी सुरक्षेसंदर्भातील फलक लावण्यात आले आहेत.

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात वर्षांसहलीचे. वसई परिसरातील चिंचोटी आणि तुंगारेश्वर येथे असलेल्या धबधब्यात वर्षांसहलीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटकांची गर्दी होत असते. शनिवार आणि रविवारी या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी तर हा परिसर तुडुंब भरलेला असतो. मात्र हा धबधब्याचा परिसर धोकादायक आहे. येथील दगडांवर पाय घसरून पडण्याची शक्यता असते. काही पर्यटक मद्यप्राशन करून धबधब्याच्या डोहात उतरतात. गेल्या काही वर्षांत या दोन्ही धबधब्याच्या ठिकाणी अनेक तरुणांचा मृत्यू झाला आहे. चिंचोटी येथे झालेले अपघात हे मुख्यत: दगडांवरून पाय घसरून आणि धबधब्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून झाले आहेत, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वनविभागाने याची दखल घेऊन येथे उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वनाधिकारी दिलीप तोंडे यांनी दिली.

उपाययोजना काय?

* चिंचोटी आणि तुंगारेश्वर येथील धबधबा परिसात सुरक्षा जाळी लावण्यात आली आहेत.

*  परिसरात विविध ठिकाणी सुरक्षेसंदर्भातील माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.

*  ज्या ठिकाणी जाणे धोकादायक आहे, त्या ठिकाणी जाऊ नका, अशी सूचना करणारे फलकही लावले आहेत.

*  सूचनांकडे दुर्लक्ष करून धबधब्यात उतरणाऱ्या पर्यटकांसाठी जीवनरक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

चिंचोटी हा धबधबा धोकादायक आहे. या धबधब्यात पर्यटकांना उतरण्यास कायद्याने मनाई आहे. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करत काही पर्यटक धबधब्यात उतरतात. त्यामुळे येथे सुरक्षेसंदर्भातील काही उपाययोजना करण्यात आलया आहेत. सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे त्यांना चाप बसणार आहे.

-दिलीप तोंडे, वनाधिकारी

चिंचोटी आणि तुंगारेश्वर या ठिकाणी मी नियमित ‘ट्रेकिंग’साठी जातो. मात्र मद्यप्राशन करून धबधब्यात उतरणाऱ्या तरुणांची संख्या या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे वनविभागातर्फे सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजना योग्य आहेत. त्यामुळे येथे बुडून मृत्यू होणाऱ्या घटनांवर आळा बसू शकतो.

-तेजस नेने, पर्यटक