डोंबिवली : पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टर, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मण्यार जातीचा साप चावून खंबाळपाडा येथील चार वर्षाची एक बालिका आणि तिच्या २४ वर्षाच्या मावशीचा मृत्यू झाला. त्यामुळे या मृत्यू प्रकरणाला जबाबदार शास्त्रीनगर रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई करावी. पालिकेत पैसे नसतील तर लोक ते जमवून देतील, असा इशारा देण्यासाठी मंगळवारी डोंंबिवलीतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांंनी शास्त्रीनगर रुग्णालयासमोर आंदोलन केले.
पाच तास चाललेल्या या आंदोलनामुळे शास्त्रीनगर रुग्णालयासमोर गोंधळ आणि तणावाचे वातावरण होते. शास्त्रीनगर रुग्णालयात रात्रपाळीत कोणत्याही डाॅक्टरचे कर्तव्य असले की ते कधीच रात्रपाळीला रुग्णालयात हजर नसतात, अशी धक्कादायक माहिती मोर्चातील चर्चेतून पुढे आली. गेल्या दीड महिन्यापूर्वी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या सूचनेवरून पालिकेतील दोन वरिष्ठ अधिकारी अचानक मध्यरात्रीच्या सुमारास शास्त्रीनगर रुग्णालयात भेटीसाठी आले होते. त्यावेळी रात्रपाळीत कर्तव्यावर असलेला एका वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात गैरहजर होता.
हे माहिती असुनही भेट देणाऱ्या वरिष्ठ आणि आरोग्य मुख्यालयाने त्या दांडीबहाद्दर डाॅक्टरची पाठराखण केली. हा विषय आयुक्तांपर्यंत पोहचणार नाही याची दक्षता घेतली. त्यावेळीच दोन वरिष्ठांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील कर्तव्यावरील दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई केली असती तर इतर अधिकाऱ्यांना तो संदेश गेला असता.
साप चावलेले दोन रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयात रात्री पालिकेत आले. त्यावेळी रुग्णालयात कर्तव्य असलेले डाॅ. संजय जाधव गैरहजर होते. यापूर्वीच्या डाॅक्टरवर कारवाई झाली असती तर आता दांडी मारण्याची हिम्मत डाॅ. जाधव यांनी केली नसती. आरोग्य मुख्यालयातील वरिष्ठही या सर्व घटनांना तेवढेच जबाबदार आहेत, अशी टीका मोर्चाच्यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.
ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, काँग्रेस प्रदेश नेते संतोष केणे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, भालचंद्र पाटील, ठाकरे गटाचे ग्रामीण प्रमुख राहुल भगत, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांच्या पुढाकाराने शास्त्रीनगर रुग्णालयासमोर कार्यकर्ते, नागरिकांच्या पुढाकारातून आंदोलन करण्यात आले.
पालिकेचा तीन हजार कोटीचा अर्थसंकल्प असताना पालिकेची आरोग्य यंत्रणा सडलेली कशी. शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्ण मरतो तेव्हाच शिक्षेचे पाऊल का उचलेल जाते. लाखो रूपये वेतन घेणाऱ्या आरोग्य प्रमुखांना रुग्णालयातील बेशिस्त दिसत नाही का. पालिका रुग्णालय सेवेत आवश्यक सुधारणा करण्यासाठी प्रशासन का पाऊल उचलत नाही. वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदी शासकीय सेवेतील अधिकारी का मागविला जात नाही, असे संतप्त प्रश्न आंदोलनकर्ते करत होते.
पालिका निषेधाच्या घोषणांनी शास्त्रीनगर रुग्णालय दुमदुमुन गेले होते. मयत प्राणवी भोईर, श्रृती ठाकूर यांचे कुटुंबीय या आंदोलनात सहभागी झाले होते. या दोघींच्या मृत्युला जबाबदार दोषींवर कठोर कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. शास्त्रीनगर रुग्णालयातील अनेक गैरप्रकारांची एका जागरूकाने आयुक्तांकडे तक्रार केली आहे. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी याप्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले आहे.
