ठाणे : नवी मुंबईत सिडकोच्या घरांच्या किमंतीवरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असतानाच आता सिडकोच्या घराचे क्षेत्रफळ कमी असल्याच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. जाहीरातीमध्ये ३२२ चौ. फूट क्षेत्रफळ इतकी सदनिका दर्शविली होती. परंतु आता विजेत्यांना २९१. ९२ चौ. फूट इतकीच सदनिका विजेत्यांच्या इरादा पत्रात नमूद आहे. त्यामुळे सिडकोच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. या प्रकारानंतर वन मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते माजी आमदार संदीप नाईक यांनी सिडकोला खरबरदारीचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनाही पत्रव्यवहार केला आहे. सिडको सोडतीतील विजेत्यांना जाहीर केल्याप्रमाणेच सदनिकाच द्याव्यात, अशी मागणी केली आहे.

नवी मुंबईत घर घेता यावे यासाठी अनेकांनी सिडकोच्या २०२४ मध्ये निघालेल्या ‘माझे पसंतीचे घर’ सोडतीमध्ये अर्ज केला होता. परंतु या सोडतीमध्ये अनेक घरांच्या किमंती या अवाक्याबाहेर होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये या सोडती विषयी नाराजी होती. घराच्या किमंती वाढलेल्या असतानाच, आता सिडकोने जाहीरातीत दिलेल्या चटई क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाची घरे उपलब्ध करुन दिल्याचे समोर येत आहे. या बाबत आता सिडको सोडतीतील विजेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सिडकोने सोडतीपूर्वी दर्शविलेल्या जाहिरातीमध्ये वाशी येथील एक ‘बीएचके’ घरांचे चटई क्षेत्रफळ ३२२ चौ.फूट दर्शविले होते. परंतु लेटर ऑफ इंटेन्ट अर्थात इरादा पत्रात घऱांचे क्षेत्रफळ २९१.९२ चौ. फूट इतकेच दर्शविले आहे. या प्रकाराविषयी विजेत्यांकडून संताप व्यक्त होत आहे. वन मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र तथा शरद पवार गटाचे नेते माजी आमदार संदीप नाईक यांनी याविषयी सिडकोला इशारा दिला आहे.

संदीप नाईक यांनी सिडकोला पत्र दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ‘सिडकोची महागृहनिर्माण योजना ‘माझे पसंतीचे घर’ २०२४ मध्ये सोडतीत विजेत्यांना मूळ जाहीर केलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटक (ईडब्यूएस) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) २६ हजार घरांची लॉटरी जाहीर केली होती. यामध्ये पनवेल (प.), खारघर बस टर्मिनस, मानसरोवर रेल्वे स्थानक, खांदेश्वर रेल्वे स्थानक, खारकोपर सेक्टर १६-अ आणि वाशी ट्रक टर्मिनस या ठिकाणी एलआयजी गटासाठी ३२२ चौ. फूट क्षेत्रफळ असलेल्या सदनिका जाहीर करण्यात आल्या होत्या. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या माहितीप्रमाणे एलआयजी गटासाठी ३२२ चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या सदनिका देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सोडतीच्या निकालानंतर विजेत्यांना मिळालेल्या इरादा पत्रात सदनिकेचा रेरा क्षेत्रफळ २९१. ९१ चौ. फूट (२७.१२ चौरस मीटर) इतका असल्याचे नमूद करण्यात आले आहे, जो मूळ घोषणा केलेल्या क्षेत्रफळापेक्षा जवळपास ३० चौरस फूट कमी आहे.

सिडको प्रशासनाने गृहनिर्माण योजनेच्या मूळ माहितीपत्रकात उल्लेख केलेल्या ३२२ चौ. फूट क्षेत्रफळ असलेल्या सदनिकाच लाभार्थ्यांना द्याव्यात, विजेत्यांना सिडकोने जाहीर केल्याप्रमाणे क्षेत्रफळाच्या सदनिकाच देण्यात याव्यात. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या क्षेत्रफळापासून वंचित ठेवले जाणार नाही, याची खबरदारी सिडकोने घ्यावी, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही या बाबतचे पत्र त्यांनी दिले आहे.