ठाणे : पुणे येथे विषारी दारुमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करुन दीड कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. तसेच याप्रकरणात ३१३ गुन्हे दाखल करुन २१३ जणांना अटक केली आहे. सर्वाधिक कारवाई ठाणे जिल्ह्यात झाल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली. या कारवाईत उपायुक्त प्रदीप पवार यांनी स्वत: सहभाग घेऊन हातभट्टीच्या ठिकाणी खाडीमधून बोटीने प्रवास करत धाड टाकल्या आहेत.
पुणे येथे विषारी दारुच्या सेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राज्यभरात सुरु असलेल्या हातभट्ट्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या निर्देशानुसार विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तयार केली. तसेच हातभट्टी निर्मिती आणि विक्री केंद्रांविरोधात मोहीम सुरु केली. २९ मे ते २ जून या कालावधीत ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात ३१३ गुन्हे नोंद करुन २१३ जणांना अटक केली. या कारवाईत १ कोटी ५८ लाख १७ हजार ५४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ठाणे जिल्ह्यातील कारवाईत दिवा, घेसर, अंजूर, आलीमघर, छोटी देसाई, मोठी देसाई, आगासन, खर्डी, सरळांबे, वाशाळा, घोरपे, पालेगाव, सावरणे, वेळू, कोरावले, वसारगाव, हाजीमलंग, कुशिवली, माणेरागाव, द्वारलीपाडा, कुंभार्ली, केवणी, कालवार, वडुनवघर, मामेखर्डी, कारीवली, मामणोली, जांभुळगाव, नांदपगाव, केशव श्रष्टी, उत्तन, मुरादागाव, कोपराखाडी, गोराई खाडी याठिकाणी कारवाई करण्यात आली. पालघर जिल्ह्यात मालजीपाडा, वसई, विरार आणि पालघर येथे तर रायगड जिल्ह्यात रावेगाव, बेकरेगाव, जावळीगाव येथे कारवाई करण्यात आली.
या कारवाईत उपायुक्त प्रदीप पवार यांनी स्वत: सहभाग घेऊन हातभट्टीच्या ठिकाणी खाडीमधून बोटीने प्रवास करत धाड टाकल्या आहेत. या धाडीत अधीक्षक उत्तम शिंदे, उपअधीक्षक अभिजीत देशमुख, निरीक्षक संजय ढेरे, दिपक परब, दुय्यम निरीक्षक अंकुश औताडे आणि इतर जवान हजर होते. कोठेही बनावट मद्य, परराज्यातील मद्य आणि अवैध मद्य निर्मिती, रसायनांची भेसळ, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
