प्रशासनाच्या कारभारावर स्थायी समितीचे ताशेरे

ठाणे : महापालिका क्षेत्रातील संशयित करोना रुग्णांचे तात्काळ निदान व्हावे आणि अशा रुग्णांमुळे होणारा करोनाचा संसर्ग रोखता यावा, यासाठी आरोग्य विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून शीघ्र प्रतिजन चाचण्यांचे संच खरेदी करण्यात येत आहे. यापूर्वी ३१ रुपये ७० पैसे दराने प्रति नग शीघ्र प्रतिजन चाचण्यांचे संच खरेदी करण्यात आलेले असताना दुसऱ्या लाटेदरम्यान हेच संच प्रति नग ६१ रुपये ६० पैसे दराने खरेदी करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. दामदुप्पट दराने खरेदी केल्याप्रकरणी स्थायी समिती सदस्यांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून गेल्या वर्षभरापासून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरात संशयित रुग्णांची प्रशासनाकडून शीघ्र प्रतिजन चाचणी करण्यात येते. याशिवाय शहरातील बस स्थानके, सार्वजनिक ठिकाणे आणि परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची शीघ्र प्रतिजन चाचणी करण्यात येते. या चाचण्यांच्या संच खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाने बुधवारी झालेल्या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रस्तावानुसार दोन लाख संच १ कोटी २३ लाख २० हजार रुपये दराने खरेदी करण्यात येणार असल्याचे पालिकेने म्हटले होते. हा प्रस्ताव चर्चेला येताच स्थायी समिती सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला. यापूर्वी ३१ रुपये ७० पैसे दराने प्रति नग शीघ्र प्रतिजन चाचण्यांचे संच खरेदी करण्यात आलेले असताना, हेच संच प्रति नग ६१ रुपये ६० पैसे दराने खरेदी करण्यात का येत आहेत, असा प्रश्न नगरसेविका मीनल संख्ये यांनी उपस्थित केला.

परराज्यात किंवा परदेशात जाण्यासाठी शीघ्र प्रतिजन चाचणीचा अहवाल ग्राह्य धरला जात नाही. केवळ आरटीपीसीआर चाचणी अहवाल ग्राह्य धरला जातो, तरीही शीघ्र प्रतिजन चाचणी खरेदीसाठी आग्रह का, असा प्रश्न भाजप नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी उपस्थित केला. शहरातील बस स्थानके, सार्वजनिक ठिकाणे आणि परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची शीघ्र प्रतिजन चाचणी करण्यात येते. यामुळे रुग्णांचा तात्काळ शोध घेणे शक्य होते. तसेच एखाद्या संशयित रुग्णांची शीघ्र प्रतिजन चाचणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते, असे आरोग्य विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितले. तसेच यापूर्वी ३१ रुपये ७० पैसे दराने प्रति नग शीघ्र प्रतिजन चाचण्यांचे संच खरेदी करण्यात आले असले तरी, दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णसंख्येत झालेली वाढ, त्यामुळे उपलब्ध असलेल्या साहित्य आणि कच्च्या मालाची वाढलेली मागणी, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने घातलेल्या र्निबधामुळे अपुरे मनुष्यबळ आणि दळणवळण साधने यांमुळे संचाचे दर वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अखेर सदस्यांची प्रस्तावाला मान्यता

‘आयसीएमआर’कडून वैध ठरविण्यात आलेल्या उत्पादक किंवा पुरवठादारांकडून संचाची खरेदी करण्यात येते. यातील लघुत्तम दराच्या पुरवठादारानेच हे दर दिले असल्याचे आरोग्य विभागाचे उपायुक्त मनीष जोशी त्यांनी स्पष्ट केले. दामदुप्पट दराने खरेदी केल्याप्रकरणी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढत स्थायी समिती सदस्यांनी नव्याने निविदा मागविण्याचा आग्रह धरला. परंतु दुसऱ्या लाटेदम्यान संचाची खरेदी करण्यात आली असून त्याच्या कामाचे काही देयक यापूर्वीच संबंधित कंपनीला देऊ केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अखेर सदस्यांनी त्या प्रस्तावास मान्यता दिली.