महिनाभरापासून गॅलरी बंद अवस्थेत, चार वर्षांपूर्वी एक कोटींचा खर्च
ठाणे : येथील सिंघानिया शाळेलगतच्या रस्त्यावर महापालिकेने सुमारे एक कोटी रुपये खर्चून तीन वर्षांपूर्वी उभारलेली आर्ट गॅलरी पादचारी पुलामुळे बाधित होणार आहे. या पुलाच्या कामासाठी गॅलरीच्या मधोमध मोठा खड्डा खोदण्यात आला असून या कामामुळे गेल्या महिनाभरापासून ही गॅलरी बंद आहे. पुलाच्या कामामुळे गॅलरीचा चार मीटरचा परिसर बाधित होणार असून यामुळे गॅलरीचा आकार कमी होण्याबरोबर तेथील सौंदर्यीकरणाला बाधा पोहचणार आहे.शहरातील चित्रकारांसाठी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सिंघानिया शाळेलगतच्या रस्त्यावर आर्ट गॅलरी उभारली होती. मुंबईतील काळा घोडाच्या धर्तीवर ही गॅलरी तयार करण्यात आली होती. या ठिकाणी ४० चित्र प्रदर्शनाची व्यवस्था तयार करण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी गॅलरीचे लोकार्पण करण्यात आल्यानंतर शहरातील चित्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले होते. अशाच प्रकारची गॅलरी शहरातील इतर रस्त्यांवर तयार करण्यात येणार असल्याचे त्यावेळी जयस्वाल यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात तसे काहीच झालेले नाही.
कॅडबरी जंक्शन ते वर्तकनगर या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून या ठिकाणी प्रशस्त रस्ता तयार झाला आहे. या ठिकाणी वाहनांचा वेगवान प्रवास सुरू झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने समतानगर ते सिंघानिया शाळा असा पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू केले आहे. या पुलाच्या खांबाच्या उभारणीसाठी सिंघानिया शाळेलगतच्या रस्त्यावरील आर्ट गॅलरीच्या मधोमधच मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून ही गॅलरी बंद आहे.
गॅलरी पूर्ववत करण्यात येणार
सिंघानिया शाळेलगतच्या रस्त्यावरील आर्ट गॅलरी २१ मीटर जागेत तयार करण्यात आली आहे. त्यापैकी ४ मीटरचा भाग पादचारी पुलाच्या कामामध्ये बाधित होणार असून त्यानंतर ही गॅलरी पुन्हा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
मनसेचे आंदोलन
पादचारी पुलाच्या कामामुळे ही गॅलरी नामशेष होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्निल मिहद्रकर यांनी ही आर्ट गॅलरी वाचविण्यासाठी सोमवारी ठिय्या आंदोलन केले. आर्ट गॅलरी वाचविण्यासाठी पालिकेने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
