ठाणे : मुंबईतील पायधुनी परिसरात बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा (फूड पॉइझनिंग) झाल्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेनंतर कलिंगडाच्या मागणीत घट झाली असून त्याचा फटका व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसत आहे.
मुंबईतील पायधुनी परिसरात दोकाडिया कुटूंब वास्तव्यास होते. शनिवारी रात्री या सर्वांनी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले. रविवारी पहाटे प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर, समाजमाध्यमांवर तसेच प्रसार माध्यमांवर या चौघांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्याने झाला असे प्रसारित होऊ लागले. अद्याप या चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी,या बातमीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. कलिंगड खायचे की, नाही असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. या घटनेनंतर कलिंगडच्या मागणीत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कलिंगड हे फळ रसाळ आणि थंडावा देणारे असल्यामुळे उन्हाळ्यात या फळाला मोठ्याप्रमाणात मागणी असते. यामध्ये सुमारे ९० टक्क्यांहून अधिक पाणी असल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते. त्यामुळे डॉक्टरांकडून देखील उन्हाळ्यात या फळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज कलिंगडच्या ८० ते १०० गाड्या दाखल होतात. एका गाडीत ६ ते ७ टन कलिंगड असतात. या बाजारातून ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरातील किरकोळ विक्रेते कलिंगडचा माल खरेदी करण्यास येतात. दररोज दुपार पर्यंत यातील ५० टक्के कलिंगडची विक्री होते. तर, दिवसभरात सर्वच कलिंगड विक्री होतात. परंतू, मुंबईतील पायधुनी परिसरातील घटनेनंर कलिंगडच्या मागणीत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमी प्रमाणे मंगळवारी सकाळपासून वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडच्या गाड्या दाखल होण्यास सुरुवात झाली. परंतू, उन्हाळ्याच्या कालावधीत दुपारपर्यंत ५० टक्के हून अधिक विक्री होणारा कलिंगडचा माल दुपारी १२ वाजून गेले तरी फारसा विक्री झाला नव्हता. किरकोळ कलिंगड विक्रेते आणि थेट बाजारसमितीत खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनी कलिंगड खरेदी करण्यास पाठ फिरविल्याचे दिसून आले. यामुळे व्यापारी वर्ग तसेच शेतकरी देखील चिंतेत आहेत.
कलिंगडची विक्री करण्यास विक्रेते धास्तावले
मुंबई, ठाणे तसेच उपनगरातील किरकोळ कलिंगड विक्रेते कलिंगड विक्री करण्यास धास्तावल्याचे चित्र आहे. पायधुनीतील घटनेबाबत ग्राहक विचारणा करतात आणि त्यानंतर कलिंगड खरेदी करायचे की नाही हे ठरवत आहेत. ग्राहकांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे हे आम्हाला समजत नाही, अशी प्रतिक्रिया किरकोळ विक्रेत्यांकडून देण्यात आली.
दररोज दुपारपर्यंत कलिंगडचा ५० टक्के हून अधिक माल विक्री होतो. परंतु, आज दुपारी १२ वाजून गेले तरी ४० टक्के माल सुद्धा विक्री झालेला नाही. किरकोळ विक्रेते देखील कलिंगड विक्री करण्यास धस्तावले आहेत, कारण ग्राहक त्यांच्याकडे या घटनेबद्दल विचारत आहे. – राहूल पाटील, कलिंगड व्यापारी
