ठाणे – ठाण्यातील घोडबंदर परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून तब्बल २१व्या मजल्यावर अजगर शिरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, पाळीव मांजरीच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. सुरुवातीला सर्पमित्रांकडून शोध घेऊनही अजगर सापडला नव्हता. मात्र, पाच दिवसांनंतर पुन्हा तो दिसून आल्याने अखेर सर्पमित्रांच्या मदतीने त्याला सुरक्षितरित्या पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
घोडबंदर भागातील न्यू होरायझन शाळेसमोरील एक २५ मजली उच्चभ्रु इमारत आहे. या इमारतीच्या २१ व्या मजल्यावरील रुम नंबर २१०४ मध्ये पाळीव मांजर आहे. पाच दिवसापूर्वी हे मांजर पहाटे ४ वाजता अचानक बाल्कनीच्या खिडकीची काच वाजवायला लागले. तसेच आवाज करु लागले. मांजरीच्या आवाजाने घरातील लोक उठली आणि ते तिच्याजवळ गेली तेव्हा त्यांना बाल्कनीच्या बाहेरच्या बाजून मोठे अजगर आढळून आले.
घरातील नागरिकांनी तात्काळ इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला दुरध्वनीवर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर, सुरक्षा रक्षकाने सर्पमित्र अतुल ऊबाळे यांना संपर्क साधून तात्काळ सोसायटीत बोलावून घेतले. तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या सर्पमित्र अतुल ऊबाळे यांनी २१०४ क्रमांकाच्या रुममध्ये तपास केला. परंतू, त्यावेळी अजगर हाती लागला नाही.
या घटनेमुळे संपूर्ण सोसायटीत भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा २१ व्या मजल्यावरील रुम नंबर २१०१ मधील रहिवासी बाल्कनीत झाडांना पाणी घालत असताना, तिथे त्यांना अजगर आढळून आला. त्यावेळी तात्काळ सर्पमित्र उबाळे यांना बोलवण्यात आले. यावेळी २१०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अजगर असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
घराची पाहणी करत असताना बाल्कनीत ठेवलेल्या झाडांच्या कुंड्यांजवळ अजगर जातीचा साप शांतपणे वेटोळे घालून बसलेला आढळून आला. त्यानंतर,अतुल यांनी नियोजनबद्ध पद्धतीने त्या अजगराला सुरक्षितरीत्या पकडून वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार त्या अजगराला सुरक्षित हरित क्षेत्रात सोडण्यात आले.
ड्रेनेज पाइपमधून २१व्या मजल्यापर्यंत अजगराचा प्रवास?
या घटनेबाबत सर्पमित्र अतुल उबाळे यांनी माहिती देताना सांगितले की, घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर हरित क्षेत्र असून गायमुख खाडीही जवळ आहे. त्यामुळे या नैसर्गिक अधिवासातूनच हा तीन फुट लांबीचा अजगर इमारतीत शिरला असावा. ड्रेनेजच्या पाइपचा मार्ग वापरून तो २१ व्या मजल्यांपर्यंत पोहोचल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
