लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात रविवारी दुपारी टँकर दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. दरीत कोसळलेल्या या टँकरमध्ये चालकासह आठ जण प्रवास करत समोर आले आहे. या अपघातानंतर मालवाहू वाहनांतून चोरट्या पद्धतीने प्रवाशांच्या होणाऱ्या वाहतुकीचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. मुंबई नाशिक महामार्गावरून अवघ्या काही रुपयांसाठी मालवाहू वाहन चालक सर्रास प्रवाशांची वाहतुक करत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

ठाणे जिल्हा आणि नाशिकला जोडणाऱ्या मुंबई नाशिक महामार्गावरून दिवसाला हजारो जड-अवजड वाहने वाहतुक करतात. तसेच हलकी वाहनांची वाहतुकही या मार्गावरून होत असते. नाशिक भागातील शेतकरी देखील दुध किंवा भाजीपाला घेऊन मुंबई नाशिक महामार्गे ठाणे, मुंबईत येत असतात. दुसरीकडे नाशिक, जळगाव भागातून मुंबईत कामानिमित्ताने अनेक प्रवासी येत असतात. नाशिक भागातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना वाहतुक खर्चाचा भुर्दंड अधिक पडतो. खासगी बसगाड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना प्रत्येक प्रवाशामागे २५० ते ३०० रुपये किंवा त्याहून अधिक रुपये मोजावे लागतात. हे दरभाडे खिशाला परवडत नाही.

आणखी वाचा- पोलीस भरतीमध्ये यंत्राचा वापर करुन काॅपीचा प्रयत्न; पाच उमेदवारांसह सातजण अटकेत

राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्यांची वाहतुक ठाण्याहून नाशिकच्या दिशेने होते. परंतु त्यांची संख्या पुरेशी नसल्याचे म्हटले जाते. त्यामुळे खासगी बसगाड्यांचा महागडा प्रवास टाळण्यासाठी आणि वेळेत मुंबईला पोहचण्यासाठी अनेकजण महामार्गालगत उभे राहून दुधाचे टँकर, टेम्पो, छोट्या मालवाहु वाहनाने प्रवास करत असतात. रविवारी दुपारी देखील अशाचप्रकारे कसारा घाटात अपघात झाला आहे. एका टँकरमधून प्रवासी वाहतुक करतात. या अपघातात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चोरट्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवाशांची वाहतुक करणे हा गुन्हा आहे. वाहन चालक खासगी बसगाड्यांपेक्षा ५० ते १०० रुपये कमी प्रवासी भाडे घेतात. त्यामुळे अनेकजण या मालवाहू वाहनांचा वापर करतात अशी माहिती येथील प्रवाशांनी दिली.

अशी होते वाहतुक

नाशिक येथून दुधाचे टँकर मोठ्याप्रमाणात ठाणे जिल्ह्यामध्ये येत असतात. वाहन चालकाच्या आसनाजवळ सुमारे सात ते आठ प्रवासी बसू शकतील, अशी रचना तयार केली जाते. अनेकदा टँकरच्या इंजिनवर उशी किंवा कापड ठेवून तिथेही प्रवासी बसविला जातो. भाजीपाला वाहून नेणाऱ्या वाहनामध्येही चालकाच्या शेजारी दोन ते तीन प्रवाशांसाठी जागा केली जाते. ट्रक, टेम्पो यामध्येही प्रवाशांची बेकायदेशीरित्या वाहतुक केली जाते. त्याचे प्रवासी दर प्रत्येकी १०० ते १५० रुपये असतात. नाशिक येथील मुंबई नाका, द्वारका चौक या भागातून ठाणे, मुंबईच्या दिशेने मोठ्याप्रमाणात वाहतुक होते. यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.