रायगडावर पर्यटकांना प्रवेशबंदी; सात डिसेंबरपर्यंत बंदी लागू करत असल्याची पोलिसांची माहिती

किल्ले रायगडबरोबरच रायगड रोप-वेही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाने म्हटलं आहे.

raigad fort tourist
यासंदर्भातील आदेश पोलिसांनी जारी केलेत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सात डिसेंबर रोजी किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव रायगड किल्ला सात डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रायगड-अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आलीय.

दिनांक तीन डिसेंबर २०२१ ते सात डिसेंबर २०२१ दरम्यान किल्ले रायगडबरोबरच रायगड रोप-वेही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाने म्हटलं आहे. रायगडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पर्यटकांची गौरसोय होवू नये म्हणून या हेतूने दौऱ्याच्या दोन दिवस आधीच ही माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं आमंत्रण दिलं होतं. हे आमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारलं आहे. “राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दिनांक ७ डिसेंबर (२०२१) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत,” असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना संभाजीराजेंनी राष्ट्रपती रायगडाला भेट देणार “ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे,” असं संभाजीराजे ट्विटरवरुन म्हणाले होते.

मोदींनीही दिलेली भेट….
यापूर्वी ५ जानेवारी २०१४ रोजी त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी रायगडाला भेट दिली होती. सांगली येथील शिव प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महानगड ते रायगड या पायी मोहिमेचा समारोप रायगड किल्ल्यावर झाला. याच कार्यक्रमासाठी मोदी उपस्थित होते. शिवरायांना अभिवादन करून त्यांनी उपस्थित जनसभेला संबोधित केलं होतं. पुणे विमानतळावरून सकाळी हेलिकॉप्टरने मोदी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील हेलिपॅडवर उतरले होते. मोदी यावेळी प्रथमच रायगडच्या दौऱ्यावर आले होते.

गडाचे दरवाजे बंद करण्यात आलेले
नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचे कारण पुढे करत ४ जानेवारीपासूनच रायगडाचे दरवाजे सर्वसमान्यांसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे स्थानिकांमधे नाराजीचा सूर दिसून आला होता. काही दिवस गडाच्या सुरक्षेची जबाबदारी गुजरात पोलीस आणि रायगड पोलीसाच्या ताब्यात देण्यात आलेली. यासाठी गुजरात पोलीसांचे पथक रायगडमधे दाखल झाले होते. कार्यक्रमाचे आयोजक आणि गुजरात पोलीस सांगतील त्यांनाच गडावर प्रवेश दिला जाईल असा फतवा काढण्यात आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raigad fort to remain close for tourist as president ramnath kovind to visit durgraj raigad to pay his respect to chhatrapati shivaji maharaj scsg

ताज्या बातम्या