बदलापूर: दोन चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणी संतप्त पालक आणि बदलापूरकरांनी मंगळवारी आदर्श शाळेसमोर तीव्र आंदोलन केले. यातील काही आंदोलकांनी साडेदहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला. त्यामुळे मुंबईहून येणारी आणि मुंबईकडे जाणारी अशा दोन्ही रेल्वे सेवेला त्याचा फटका बसला.
मंगळवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन आक्रमक रूप घेत असतानाच यातील काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला. साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद पाडली. रेल्वे रुळावर आंदोलक बसल्याने एकाच गोंधळ उडाला त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली. अकरा वाजेपर्यंत पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आंदोलक आरोपीच्या फाशीची मागणी करत घोषणाबाजी करत होते.