ठाणे – गेल्या अनेक वर्षांपासून दिवा आणि मुंब्रा येथील प्रवासी संघटनांकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाने कानाडोळा केल्याने अनेक येथील प्रवाशांना नियमित स्वरूपात भेडसावणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष होत राहिले. दिवा रेल्वे स्थानकात मोकळ्या सुटसुटीत जिन्यांची उभारणी, अधिकाधिक जलद गाडयांना थांबा, खांब रेल्वे रुळापासून थोडे लांब लावण्यात यावे, शालेय विद्यार्थ्यांसाठी किमान सकाळी तरी जलद गाडीला थांबा देण्यात यावा, मुंब्रा रेल्वे स्थानकात जलद गाड्यांसाठी प्लँटफॉर्मची उभारणी केली मात्र गाड्याच थांबत नाही यांसारख्या अनेक समस्यांसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाला याचे कोणतेही सोयर सुतक नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
मध्य रेल्वेवरील कर्जत ते सीएसएमटी आणि कसारा ते सीएसएमटी या मार्गावरील प्रवाशांना गर्दी नवीन नाही. मात्र गेल्या काही वर्षात मुंबईहुन ठाणे, कल्याण आणि इतर उपनगरांमध्ये वास्त्यव्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे या स्थलांतरित लोकसंख्येचा ताण हा ओघाने आलाच. परिणामी लोकल गाड्यांमध्ये तसेच रस्त्यावरील वाहतुकीत देखील मोठा फरक पडला. याच वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने दिवा आणि मुंब्रा येथील प्रवाशांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत अनेकदा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र प्रवाशांच्या या मागण्यांकडे रेल्वेने कायम दुर्लक्ष केल्याने रेल्वे प्रवाशांना प्रवास करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे सोमवारी झालेल्या अपघातानंतर तरी रेल्वे प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिवा मुंब्रा येथील प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.
मागण्या कोणत्या ?
– मुंब्रा येथील अपघाती वळणाप्रमाणेच ठाणे येथे जाताना रेती बंदर बोगद्याजवळील असेच तीव्र आणि अपघाती वळण आहे. याबाबत देखील उपायोजना राबविण्यात याव्या.
– दिवा रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. यामुळे गर्दीचा या ताण कमी करण्यासाठी अधिकाधिक जलद गाडयांना दिवा येथे थांबा देण्यात यावा.
– दिवा रेल्वे स्थानकात डोंबिवली दिशेकडील फलाट क्रमांक १-२ येथील पादचारी पुलाला जोडणारा ब्रिज अत्यंत अरुंद असून दररोज चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण होते यामुळे पुलाचे रुंदीकरण करण्यात यावे.
– दिवा रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम गेले तीन ते चार वर्ष अर्धवट आहे, ते पूर्ण करण्यात यावे.
– सकाळी ९ ते १०.३० सुमारास जलद गाडयांना दिवा येथे शाळकरी मुलांसाठी जलद गाडयांना थांबा देण्यात यावा.
– मुंब्रा येथे फलाट तर बांधून ठेवले आहेत मात्र जलद गाड्यांच्या थांब्यांची संख्या अत्यंत कमी आहे. त्या वाढविण्यात याव्या
– या दोन्ही स्थानकांदरम्यान खांबाचे प्रमाण अधिक असून त्यांचे आणि रुळांमधील अंतर जास्त करण्यात यावे.
– दिवा रेल्वे स्थानकात आद्यपही आरक्षण केंद्र नाही. यांसारख्या विविध मागण्यांसाठी प्रवासी सातत्याने पाठपुरावा करत आहे.
सोमवारी दिवा – मुंब्रा स्थानकादरम्यान अपघात घडला आणि काही प्रवाशांना त्यात आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजनांची घोषणा केली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही दिवा आणि मुंब्रा येथील प्रवाशांच्या मागण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. त्यासाठी देखिल प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे.- आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना