पाचवी, सहावी मार्गिका लवकरच सेवेत

मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

अंतिम चाचपणी सुरू, कामे अखेरच्या टप्प्यात

भगवान मंडलिक

डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण होताच सुरक्षा विभागाकडून पाहणी केली जाईल. त्यानंतर विभागाच्या सूचनांची अंमलबजावणी झाली की मुंबई रेल्वे विकास महामंडळ मध्य रेल्वे प्रशासनाकडे ही मार्गिका हस्तांतरित करील. त्यानतर ही मार्गिका प्रवासी सेवेत येईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) एका उच्चपदस्थ सूत्राने दिली.

मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या मुंब्रा, कळवा दरम्यानच्या नवीन मार्गिकेतील रेल्वे मार्ग, उड्डाण मार्गिका, विद्युतीकरण, दर्शक यंत्रणा, सांडपाणी निस्सारण ही व्यवस्था बांधून पूर्ण झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानक, कळवा स्थानकांच्या पारसिक ठाणे बाजूकडील बोगद्याबाहेर रेल्वे रूळ (कट अ‍ॅन्ड कनेक्शन) मार्गिका बदल हा या मार्गिकेवरील सर्वात मोठा बदल आहे. या कामासाठी एकाच दिवशी मोठय़ा कालावधीचे ब्लॉक घ्यावे लागणार आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

विलंब कशामुळे?

पाचव्या, सहाव्या मार्गिकेतील मुंब्रा ते कळवा दरम्यानचे काम आव्हानात्मक होते. वारसा वास्तू म्हणून पारसिक बोगद्याचे जतन आवश्यक असल्याचे सांगत बोगद्याचे आयुर्मान पाहता पुरातत्त्व विभागाने बोगद्याजवळ कोणत्याही बांधकामस परवानगी दिली नाही. त्यामुळे एमआरव्हीसीला मुंब्रा रेल्वे स्थानका जवळून खाडीकिनारी मार्गाने पारसिक बोगद्याच्या ठाणे दिशेकडे पाचवी, सहावी मार्गिका काढावी लागली.

मुंब्रा-कळवा दरम्यान नवीन मार्गिकेची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. अंतिम टप्प्यातील किरकोळ कामे पूर्ण करण्यात येत आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या मार्गिकेची पाहणी करून काही सूचना केल्या की त्याप्रमाणे फेरबदल करून या मार्गिका ‘एमआरव्हीसी’कडून मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केल्या जातील. लवकरच हा मार्ग प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होईल.

सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी एमआरव्हीसी, मुंबई

महत्त्वाची मार्गिका

मुंब्रा-पारसिक बोगदा ते कळवा दरम्यान बांधलेली मार्गिका अस्तित्वात आल्यानंतर मुंब्रा स्थानकातील जुने फलाट तीन, चार क्रमांकाने ओळखले जातील. या मार्गिकांवरून जलदगती सीएसएमटी, कल्याण दिशेने लोकल धावतील. नवीन मार्गिकांवरून धिम्या गतीच्या लोकल धावतील. पारसिक बोगद्यातील सध्याच्या तीन, चार मार्गिका पाचवी, सहावी मार्गिका म्हणून ओळखल्या जातील. एक, दोन फलाटावरून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलला एक बोगदा लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Railway line service soon ysh

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद
ताज्या बातम्या