ठाणे – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट दूरध्वनीवरून ठाणे-मुलुंड दरम्यान प्रस्तावित असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे रखडलेले सर्व काम तात्काळ सुरू करण्यात येईल आणि त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च रेल्वे प्रशासन उचलणार असल्याची माहिती दिली आहे. ही महत्त्वाची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली असून, या निर्णयामुळे ठाणे-मुलुंड परिसरातील लाखो दैनंदिन रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून सातत्याने होत होती. दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या, दोन्ही स्थानकांवरील गर्दी आणि परिसराचा झपाट्याने होत असलेला विकास लक्षात घेता या स्थानकाची गरज अत्यंत महत्त्वाची बनली होती. मात्र, मंजुरी मिळूनही विविध कारणांमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला होता, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट फोन करून, ठाणे-मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे उर्वरित सर्व काम तात्काळ सुरू करण्यात येईल आणि त्यासाठी लागणारा संपूर्ण निधी रेल्वे प्रशासन उचलणार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे आता नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे काम वेगाने पुढे जाणार असून, ठाणे-मुलुंड परिसरातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाला पूर्वीच मंजुरी मिळाली होती. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडने आपल्या वाट्याचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण केले होते. मात्र, सुरुवातीला सुमारे १२० कोटी रुपयांचा असलेला प्रकल्प खर्च वाढून २४५ कोटी रुपयांहून अधिक झाला. मार्च २०२५ मध्ये स्मार्ट सिटी मिशनचा कालावधी संपल्याने अतिरिक्त निधी उपलब्ध झाला नाही. यामुळे हे काम थांबले होते. याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनादरम्यान खासदार नरेश म्हस्के आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. नागरिकांचा रोजचा प्रवास, वाढती गर्दी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रखडलेले काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.