scorecardresearch

कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरणाऱ्या दोन जणांना अटक, कल्याण लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

कल्याण रेल्वे स्थानकात सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे मोबाईल लांबविण्याचे प्रकार वाढले होते

कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरणाऱ्या दोन जणांना अटक, कल्याण लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

कल्याण रेल्वे स्थानकात गर्दीच्या वेळेत प्रवाशांच्या हातामधील महागडे मोबाईल चोरून पसार होणाऱ्या दोन जणांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. हे दोन्ही चोरटे मुंब्रा येथील रहिवासी आहेत. चोरट्यांकडून चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. रूस्तम सिद्दीकी (२४), जाहीद अन्सारी (२५) अशी आरोपींची नावे आहेत.

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाटांवर प्रवासी म्हणून येऊन सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे मोबाईल लांबविण्याचे प्रकार वाढले होते. मोबाईल चोरीचे गुन्हे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान फलाटांवर अशा चोरांवर नजर ठेऊन पकडण्याच्या प्रयत्नात होते. गुरुवारी आसनगाव लोकलने प्रवास करणाऱ्या एक प्रवासी दरवाजात हातात मोबाईल घेऊन उभा होतात. गाडी सुरू होताच त्या प्रवाशावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने प्रवाशाच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळ काढला. गाडी सुरू झाल्याने प्रवाशाला काही करता आला नाही. लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

फलाटावरील सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी तपासले. त्यामध्ये दोन तरूण मोबाईल हिसकावून पळून जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याची माहिती काढली. ते मुंब्रा येथील असल्याचे समजले. पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच, मोबाईल चोर पुन्हा कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरीसाठी रविवारी येणार आहे, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. मोबाईल चोर सिद्दीकी कल्याण रेल्वे स्थानकात ठरल्या वेळेत येताच, पोलिसांनी सापळा लावून अटक केली. त्याने रेल्वे स्थानकात मोबाईल चोरी केल्याची कुबली. सोबतच्या तरूणाचे नाव अन्सारी आहे. तो मुंब्रा येथील रशीद कम्पाऊंड येथे राहतो, अशी माहिती मिळताच पोलिसांनी त्यालाही अटक केली. चोरीचे मोबाईल आरोपींकडून हस्तगत केले आहेत.

ते सराईत चोर आहेत का. त्यांनी आतापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत याचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-04-2022 at 16:59 IST

संबंधित बातम्या