ठाणे, कल्याण : मध्य रेल्वेच्या ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, टिटवाळा आणि वांगणी स्थानकांत प्रवाशांच्या डोक्यावरील छत गायब झाले आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना ऊन आणि पाऊस असा दुहेरी मारा सहन करत उपनगरी रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. पावसात प्रसंगी प्रवाशांना छत्र्या उघडून उभे राहण्याची वेळ आली आहे. फलाटावर दाटीवाटीने उभे राहिलेल्या प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे स्थानकात प्रचंड वर्दळ असते. या स्थानकातून रोज पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करतात. यात ठाणेपलीकडील परिसरातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर प्रवाशांची सध्या मोठी गैरसोय होत आहे. या फलाटाची रुंदी काही मीटर वाढविण्यात आली असली तरी हा फलाट छताविना आहे. फलाटाची रुंदी वाढवण्यात आली असली तरी वाढवलेल्या जागेपुरते छत अस्तित्वात नाही. रेल्वे प्रशासनाने तात्पुरते छत उभारले आहे. यासाठी बांबूंचा आधार देऊन त्यावर ताडपत्री टाकण्यात आली आहे. मात्र, त्यातूनही पावसाचे पाणी फलाटावर पडत आहे. इतर फलाटांवरही काही भागांतही छत नाही.

हेही वाचा – “५० कोटी रुपये देऊन जनतेला विकत घ्याल ही अपेक्षा ठेवू नका”, आव्हाड यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका

ठाणे स्थानकाखेरीज इतर स्थानकांची स्थितीही तशीच आहे. डोंबिवली स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर गेली दोन वर्षे छत नाही. तर टिटवाळा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोनवरील काही भागांत छत नाही. शिवाय दिवा-वसई मार्गावरील उन्नत कोपर रेल्वे स्थानकाच्या विस्तारित भागात छत नाही.

कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक पाच, सहा आणि सातवरील काही भागांत छताचा पत्ता नाही. उल्हासनगर स्थानकातही अशीच स्थिती आहे. अंबरनाथ स्थानकातील फलाट एकवर मुंबई दिशेकडील बाजूस छत नाही. बदलापूर रेल्वे स्थानकात पादचारी पुलांचे काम सुरू आहे. नव्याने उभारलेल्या फलाट क्रमांक ‘एक अ’वर तिकीट घर परिसरात बांबूचे छत उभारण्यात आले आहे. मात्र, फलाट एक व दोनवर छत नाही. वांगणी स्थानकात दोन्ही फलाटांवर मधोमध छत नाही.

कर्जत दिशेकडील रेल्वे स्थानकातील प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या दृष्टीने पायभूत सुविधा वाढलेल्या दिसत नाहीत. – प्रतीक म्हसे, प्रवासी

बदलापूर स्थानकातून उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये चढणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पाऊस पडल्यास या गर्दीत छत्री उघडणे अशक्य होते. – भाविका शेलार, प्रवासी

डोंबिवली स्थानकासह विस्तारीकरण केलेल्या फलाटावर छत बसवावे म्हणून आपण दीड वर्षापासून रेल्वे अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहोत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला आहे. अधिकारी हे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, अशी तकलादू कारणे देऊन वेळ मारून नेत आहेत. – लता अरगडे, अध्यक्षा उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघ

हेही वाचा – कळवा, मुंब्रा, दिवा भागात शुक्रवारी पाणी नाही; ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार

मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांत निरनिराळी अभियांत्रिकी कामे सुरू आहेत. पादचारी पुलांची उभारणी, सरकते जिने, छत उभारणी अशा कामांचा समावेश आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांना दिलासा दिला जाईल. गळतीच्या समस्या असलेल्या स्थानकांत दुरुस्तीची कामे सुरू आहेत. – डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

ठाणे, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आणि इतर रेल्वे स्थानकांतील फलाटांचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर तात्काळ त्या भागात निवारा उभारणे आवश्यक आहे. रेल्वे अधिकारी अशी कामे रेंगाळत का ठेवतात, हा प्रश्न आहे. उन्हाळ्यात प्रवासी आडोसा घेऊन फलाटावर उभे राहतात.

  • मनोज भोळे, प्रवासी
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway stations without roofs heat and rain hit passengers in thane dombivli kalyan ambernath badlapur stations ssb
Show comments