जून महिन्यापासून सुरू झालेला पाऊस डिसेंबरमध्येही सुरूच, जिल्ह्यात ११२ टक्के पाऊस 

सागर नरेकर

ठाणे: तौक्ते वादळामुळे कोकण क्षेत्रातील ठाणे जिल्ह्यात मे महिन्यात पाऊस सुरू झाला होता, तर जून महिन्यात सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे. सलग सात महिने पाऊस पडण्याचा प्रकार अनेक वर्षांनंतर झाला आहे. त्यातही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या पावसाची सरासरी आधीच्या वर्षांच्या तुलनेत अधिक असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव जाणवल्याने पाऊस पडला होता. जून महिन्यात अखेरीस परतलेल्या पावसाने जुलै महिन्यात पुन्हा दडी मारली. मात्र दुसऱ्या आठवडय़ात संततधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांना पूर आला होता. मोसमी पावसापासून सुरू झालेला पावसाचा प्रवास डिसेंबर महिन्यापर्यंत सलग सातव्या महिन्यातही सुरूच आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून सातत्याने सहा महिने पाऊस पडण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे.

बुधवारी जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस कोसळला. १ ते २ डिसेंबर या २४ तासात ठाणे जिल्ह्यात सरासरी ६८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस ठाणे शहरात कोसळला असून तेथे ८४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल कल्याण तालुक्यात ७८, उल्हासनगरमध्ये ७४, अंबरनाथमध्ये ६७, भिवंडीत ६० तर मुरबाडमध्ये ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. डिसेंबर महिन्यात एका दिवसात झालेल्या पावसाची ही सरासरी गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११२ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. गेल्या चार वर्षांत सातत्याने डिसेंबपर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे.

जिल्ह्य़ात २,८३२ मिलिमीटर पावसाची नोंद

ठाणे जिल्ह्य़ात जून ते सप्टेंबर महिन्यात २,६९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात सप्टेंबपर्यंत अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिक १३४ टक्के पावसाची नोंद झाली होती. तर या चार महिन्यांच्या काळात जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस मुरबाड तालुक्यात झाला होता. मात्र ऑक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यात हजेरी लावल्यानंतर डिसेंबर महिन्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात आतापर्यंत २,८३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या चार वर्षांपासून पाऊस पडण्याचा कालावधी पाच ते सहा महिन्यांपर्यंत गेला आहे. त्याची विविध कारणे आहे. ईशान्य भागात असलेल्या मोसमी प्रभावाचा परिणाम होतो. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ांचाही परिणाम विशेषत: कोकणावर जाणवतो आहे. मात्र यंदाच्या वर्षांत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या पावसाची सरासरी अधिक आहे. 

अभिजीत मोडक, खासगी हवामान अभ्यासक, बदलापूर.