आयुक्तांच्या खड्डेभरणीच्या आदेशाला अभियंता विभागाची केराची टोपली
ठाणे : पावसाळा सरून महिनाभराचा काळ लोटला तरी शहरातील रस्त्यांवरील खड्डे अद्यापही कायम आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही शहरातील अनेक भागातील खड्डे बुजविण्यात अभियंता विभाग सपशेल अपयशी ठरल्याने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना अखेर रविवारी रस्त्यावर उतरून खड्डे तातडीने बुजवावेत, असे आदेश द्यावे लागले. महत्त्वाचे म्हणजे आयुक्तांनी यापूवीही अशा प्रकारचे आदेश अभियंता विभागाला दिले आहेत. त्यामुळे या विभागाचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात यंदाच्या पावसाळय़ात रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले. पाऊस थांबताच खड्डेभरणीची कामे पालिकेने हाती घेतली. राडारोडा आणि बारीक खडीच्या साह्याने खड्डे भरणीची कामे केली जात होती. पाऊस पडताच बुजवलेले खड्डे उखडले. त्यानंतर डांबरच्या साहाय्याने खड्डे बुजविण्यात आले. काही दिवसांतच डांबर उखडल्याने ही कामेही वादग्रस्त ठरली. रस्त्यावरील खड्डेभरणीच्या कामांवरून चार अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील महामार्गाचा पाहाणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन रस्ते दुरुस्तीचे काम करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पालिकेसह सार्वजनिक बांधकाम, एमएमआरडीए अशा सर्वच विभागांनी खड्डेभरणीची कामे सुरू केली खरी, मात्र काही दिवसांतच परतीचा पाऊस सुरू झाल्याने या कामात अडथळा निर्माण झाला. हा पाऊस थांबून महिनाभराचा काळ लोटला तरी शहरातील रस्त्यांवरील खड्डे अद्यापही कायम असून या खड्डय़ांमधून प्रवास करावा लागत असल्याने ठाणेकरांमधून आता टीकेचा सूर उमटू लागला आहे.
या ठिकाणी खड्डे
ठाणे शहरातील तीन हात नाका, लुईसवाडी, कॅडबरी जंक्शन, विवियाना मॉल सेवा रस्ता, कापूरबावडी नाका, घोडबंदर महामार्गालगतचा सेवा रस्ता, बाळकुम चौक, शहरातील अंतर्गत रस्ते, मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूल, वंदना सिनेमागृहाजवळीत उड्डाणपूल.
आयुक्तांचा पुन्हा रस्ते पाहणी दौरा
पालकमंत्री आणि आयुक्तांच्या आदेशानंतरही खड्डेभरणीची कामे पूर्ण होत नसल्याने महापालिकेचा कारभारावर टीका होत आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी रविवारी सकाळी तीन हात नाका, लुईसवाडी, कॅडबरी जंक्शन, विवियाना मॉल सेवा रस्ता, कापूरबावडी नाका या भागांची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने भरण्याचे आदेश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.