बदलापूरः पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बदलापुरजवळील कोंडेश्वर, बारवी धरण परिसरात ठाण्यापासून हजारो पर्यटक येत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून काही दुर्घटना झाल्याने जिल्हा प्रशासन या पर्यटनस्थळांवर सातत्याने सरसकट बंदी लादत आहेत. अशाच प्रकारची बंदी पुन्हा एकदा अंबरनाथ तालुक्यातील विविध ठिकाणी घालण्यात आली आहे. कोंडेश्वर परिसर तसेच बारवी धरण परिसरात तीन किलोमीटर हद्दीत ४ जुलैपासून मद्यपान करणे, धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे, खोल/वाहत्या पाण्यात उतरणे किंवा पोहणे आदी कृत्यांना प्रतिबंध करण्यात आले आहे. यासंबंधीचा आदेश अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी जारी केला आहे.
ठाणे जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यात पावसाळी पर्यटन केंद्र विकसीत झाली आहेत. या पर्यटन केंद्रांवर अवलंबून असलेली स्थानिकांची एक अर्थव्यवस्थाही उभी झाली आहे. मात्र या ठिकाणी झालेल्या काही तुरळक दुर्घटनांमुळे ही पर्यटन ठिकाणे ऐन पावसाळी हंगामात टाळेबंद करण्याचा प्रघात गेल्या काही वर्षांपासून पडला आहे. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती अंबरनाथ तालुक्यात पहायला मिळते आहे. अंबरनाथ तालुक्यातील पावसाळी पर्यटन ठिकाणांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यात अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर, चांदप गाव हद्दीतील बारवी धरण परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. कोंडेश्वर परिसरातील धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीचीवाडी तसेच चांदप गावच्या हद्दीतील बारवी धरण परिसरातील बारवी नदी, पिंपळोली, आस्नोली, सागाव ते बारवी धरण गेट क्रमांक तीन येथील या परिसराच्या तीन किलोमीटर क्षेत्रात प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात तीन किलोमीटरपर्यंत दुचाकी, चारचाकी किंवा सहाचाकी वाहनांने प्रवेश करण्यास प्रतिबंध असेल. स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत पत्र दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अंबरनाथच्या तहसिलदार प्रशांती माने यांनी दिली आहे. या निर्णयावर आता सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही असामाजिक तत्वांमुले सरसकट सर्वांच्या पर्यटनावर बंदी आणणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.



