पावसाळी पादत्राणांचे स्टाइल स्टेटमेंट

जूनमध्ये धो धो बरसणारा पाऊस ऐन जुलै महिन्यात मात्र रुसून बसला आहे. अगदी एप्रिल-मे महिन्यासारखे कडक ऊन पडू लागले आहे.

जूनमध्ये धो धो बरसणारा पाऊस ऐन जुलै महिन्यात मात्र रुसून बसला आहे. अगदी एप्रिल-मे महिन्यासारखे कडक ऊन पडू लागले आहे. आता जवळपास तीन आठवडे झाले पावसाने दांडी मारली आहे. अर्थात पाऊस नसला तरी बाजारात खास पावसाळ्यातच विकल्या जाणाऱ्या वस्तूंची मात्र रेलचेल आहे. दरवर्षी जून महिना उजाडला, पहिला पाऊस पडला आणि शाळा उघडल्या की बाजारात पावसाळी वस्तूंची खरेदी सुरू होते. त्यात प्राधान्याने छत्र्या, रेनकोट आणि चपलांचा समावेश असतो. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ असे म्हटले जात असले तरी दरवर्षी या पावसाळी वस्तूंमध्ये काही ना काही नावीन्यपूर्ण असतेच. कारण अगदी सर्वसामान्य ग्राहकही अगदी साधी चप्पल घ्यायची असली तरी दुकानदाराला ‘जरा नवीन काय आहे ते दाखवा’ अशी फर्माईश करीत असतो. भर पावसातही आपण गबाळे दिसू नये, टापटिप दिसावे, हा त्यामागचा हेतू असतो.
आताही बाजारात पावसाळी चप्पल आणि बुटांमध्ये एवढे प्रकार आले आहेत, की घेणारा गोंधळून जातो. त्याला ‘हे घेऊ की ते घेऊ ’ असा प्रश्न पडतो. एवढे छान छान रंग आणि डिझाइन्स त्यात आहेत. या ॠतूमध्ये कॉलेजियन्सकडून ‘बेली वेज हिल’ या वॉटरप्रूफ आणि सहज वॉशेबल बेलीला पसंती मिळत आहे. त्याची किंमत १५० ते ३५० च्या दरम्यान असून, त्यात भरपूर प्रकार आहेत. क्रॉक्स स्टाइल शूज, फ्लिप-फ्लॉप चप्पल, मलाई चप्पल, आर अँड बी सँडल असे विविध प्रकार चप्पलमध्ये आहेत. विशेष म्हणजे सर्व वस्तूंची किंमत सर्वाना परवडेल अशीच आहे. १३० ते २५० रुपयांपर्यंत त्या उपलब्ध आहेत.
निऑन रंगाला ग्राहकांकडून खूप मागणी आहे, असे गावदेवी मार्गावरील चप्पल विक्रत्यांनी बोलताना सांगितले. त्यातही हलक्या वजनाच्या चप्पल, शूज, सँडल, क्रॉक्सला अधिक पसंती मिळते. स्लीप ऑन चप्पल ही युनिसेक्स (मुले-मुली दोघेही वापरू शकतील असे)असून रेनी सीझन स्पेशल आहे.
क्रॉक्स चप्पल पायांना मुलायम वाटते. हे क्रॉक्स रबरापासून तयार करण्यात आले आहेत. भडक केशरी, निळा, हिरवा अशा वेगवेगळ्या रंगांमधील हे क्रॉक्स पायांना एक फंकी लूक देतात. काही क्रॉक्सवर फुलपाखरे, कार्टून्स, असल्यामुळे लहान मुलांपासून मोठय़ा मुलींपर्यंत या क्रॉक्ससाठी पसंती दिली जाते. तसेच विविध आकाराचे चमकणारे काचेचे हिरे वापरून या क्रॉक्सना अधिक रंजक रूप देण्यात आले आहे. अशा प्रकारच्या क्रॉक्सची युवतींमध्ये जास्त क्रेझ दिसून येते.
फ्लिप फ्लॉप -पावसाळी फॅशनेबल चप्पलांमध्ये फ्लिप फ्लॉप प्रकारच्या चप्पलांनाही तरुणींकडून बाजारात विशेष मागणी आहे. निळ्या आणि लाल रंगातील एॅनिमल प्रिंट बेली, फॅन्सी एॅक्युप्रेशर स्लिपर युवतींसोबत महिलांच्याही आवडत्या आहेत. लहान मुलांसाठी त्यांच्या नाजूक त्वचेला सूट करतील अशा चप्पल आहेत. खास करून क्रॉक्समध्ये निरनिराळ्या प्रकारे उपलब्ध आहेत.

मुलांची पावसाळी फॅशन
पावसाळी फॅशनची क्रेझ फक्त लहान मुले आणि मुलींमध्येच नाही, तर मुलांमध्येही ती रूजू लागली आहे. मुलांचे बूट आणि सँडल्समध्ये मुलींसारखे नक्षीकाम नसले तरी प्लास्टिक आणि चामडे यांचा वापर करून मुलांच्या पावसाळी चपलांमध्येही नावीन्य आणण्यात आले आहे. पारको, क्रॉक्स, क्रॉक बँड हे चप्पलांचे प्रकार मुलांसाठी बाजारात उपलब्ध आहेत. पावसाळ्यात सहज भटकायचे म्हणून घराबाहेर पडताना टीशर्ट, थ्री फोर्थसोबत हे क्रॉक्स मुलांसाठी उत्तम पर्याय आहेत.
ऑफिस किंवा कॉलेजसाठी जाताना वेगवेगळ्या ब्रँडचे बुट, चपला मुलांसाठी उपलब्ध आहेत. या चपलांचे सोल प्लास्टिक किंवा चामडय़ापासून तयार करण्यात आले आहेत. बूट आणि चपलांच्या सोलला वेगळा रंग देऊन बाजारात आणलेले नवे जोडही तरुणांच्या पसंतीस उतरले आहेत.

कुठे मिळणार?
* गावदेवी मार्केट, जांभळी नाका, राम मारुती रोड, गोखले रोड, कोरम मॉल, डि-मार्ट, विवियाना मॉल येथे रस्त्यावर अगदी स्वस्तात ही पादत्राणे उपलब्ध आहेत.
* किंमत – २०० रुपयांपासून पुढे पावसाळी चप्पला बाजारात उपलब्ध आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rainy footwear fashion trend

ताज्या बातम्या