MNS-Shinde Sena alliance in Kalyan-Dombivali: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. महायुतीमधील शिवसेनेने (शिंदे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच नगरसेवकांचा पाठिंबा घेतला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे आणि शिवसेना (शिंदे) एकत्र सत्तेत असणार असे जाहीर केले. मनसेच्या नेत्यांनीही या आघाडीचे स्वागत केले आहे. त्यामुळे आता वेगळीच चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. या सगळ्या घडामोडींवर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलत असताना राजू पाटील म्हणाले, “कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपाचे ५० नगरसेवक आहेत, तर शिवसेनेचे (शिंदे) ५३ नगरसेवक आहेत. गेल्या काही दिवसांपासून केडीएमसीत खेळ चालू होता. आकडेमोड, पळवापळवी सुरू होती. भविष्यात केडीएमसीतील समित्यांच्या निवडणुकीत गडबड होण्याची शक्यता होती. अशावेळी आम्ही कुठेतरी स्थिर राहावे, यासाठी शिवसेनेला (शिंदे) पाठिंबा दिला आहे.”

कामं होण्यासाठी पाठिंबा

सत्तेसाठी पाठिंबा देऊन मनसेला काय मिळणार? असा एक प्रश्न यावेळी राजू पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, आमची वॉर्डातील कामे झाली, तरी आमच्यासाठी खूप आहे.

उद्धव ठाकरेंना याची कल्पना दिली का?

मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यामुळे या युतीबाबत त्यांना माहिती देण्यात आली आहे का? असा प्रश्नही राजू पाटील यांना विचारण्यात आला होता. “आम्ही युतीमध्ये लढलो होतो. पण सुरुवातीलाच काही नगरसेवक गायब झाले. अशावेळी आम्हाला दोन्ही गटाच्या नगरसेवकांची चिंता होती. त्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला. कल्याण-डोंबिवलीमधील जनता पळवापळवीला कंटाळलेली आहे.”

राज ठाकरेंना आम्ही केडीएमसीतील गणित सांगितले तेव्हा त्यांनी आम्हाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत, असे मनसेचे नेते राजू पाटील यांनी सांगितले. आमच्या पाच नगरसेवकांसह आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो नसतो. म्हणून सत्तेत राहून आम्ही त्यांच्यावर अंकुश ठेवू. भलेही आम्ही सरकार पाडू शकत नसू, पण विकासाच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर काम करू, असेही राजू पाटील म्हणाले.