ठाणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मुद्दाच नसल्याचे मत मांडत ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कळवा येथील सभेत बोलताना मांडला. खासदार झाल्यावर हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोंढे आवरा, असा सल्लाही त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना दिला. ठाणे लोकसभा मतदार संघातील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदार संघातील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कळवा येथे जाहीर सभा घेतली. आतापर्यंत आणीबाणी, बोफर्स, कांदा, बाबरी मज्जिद, विदेशी महिला, शायनिंग इंडिया, अशा मुद्द्यांवर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी आणि पुलवामा मुद्द्यांवर निवडणुका पार पडल्या. यंदा निवडणुकीत मुद्दाच नसल्यामुळे आई बहिणींचा उद्धार केला जात असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. हेही वाचा.नाराज होऊ नका, मोदींसाठी निवडणुकीचे काम करा; भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल.संतोष यांचा ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना संदेश लोकसंख्येच्या आधारावर महापालिकांची निंर्मिती केली जाते. ठाणे जिल्ह्यात बाहेरील राज्यातून येणाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे. यामुळे राज्यातील एकट्या ठाणे जिल्ह्यात सात महापालिका आहेत. तर, इतर जिल्ह्यात केवळ एकच महापालिका आहे. देशातील ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे की इथे परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या जिल्ह्यामध्ये किती माणसे आली आणि किती माणसे येत आहेत, याचा अंदाज नाही. आधीच ठाणे जिल्ह्यातील सगळ्या महापालिका विस्कटलेल्या आहेत. त्यात लोंढे वाटत राहिले तर त्या अजून विस्कटून जातील आणि मूळच्या माणसांच्या हाताला काहीही लागणार नाही, असेही ते म्हणाले. जिल्ह्यांमध्ये लोंढा येण्याचे प्रमाण वाढतच राहिले तर कितीही निधी आणून काम केले तरी ते पुरेसे पडणार नाही. त्यामुळे खासदार झाल्यावर हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोंढे आवरा, असा सल्लाही त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना दिला.अनेक वर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठींना माणसांना माझा विरोध नाही पण त्यांना फक्त एकच अट आहे ती म्हणजे मराठी भाषा बोलता पाहिजे, असेही ते म्हणाले. राज्यात फोडाफोडीचे राजकारण शरद पवार यांनी सुरू केले. शिवसेनेने आमचे सहा नगरसेवक खोके देऊन फोडले, तेव्हा काहीच वाटले नाही आता टाहो फोडत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांना पक्षात घेऊन पद दिले. तेव्हा कुठे गेले तुमचे वडीलप्रेम अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मुंब्र्यात आतापर्यंत अतिरेक्यांना अटक करण्यात आलेल्या कारवाईचा पाढा त्यांनी वाचला. देश विघातक शक्ती दूर करण्यासाठी विकासाबरोबरच सुरक्षा महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. हेही वाचा.ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात; ८५ वर्षावरील ६३४ तर, १०३ दिव्यांग नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क आनंद दिघे यांच्यासोबत माझी चांगली मैत्री होती. मी ठाण्यात आल्यावर त्यांच्यासोबत शहरात फिरायचो. हे टुमदार शहर होते. त्यावेळी ठाणे शहराला तलावांचे शहर म्हटले जात होते. हे तलाव बुजले आणि आता टँकरने पाणी पुरवठा होतोय, असेही ते म्हणाले. हेही वाचा.कल्याण पूर्वेत काटेमानिवली भागात अल्पवयीन मुलीचा विनयभंग आंनदाश्रमाला भेट कळवा येथील ९० फूट रस्त्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा रविवारी पार पडली. या सभेपुर्वी त्यांनी टेंभी नाका येथील आंनदाश्रमात भेट देऊन तिथे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आंनदाश्रमाला भेट दिली. इथे त्यांचे शिंदेच्या सेनेकडून स्वागत करण्यात आले.