scorecardresearch

महागाईबाबत राज यांचे मौन! जितेंद्र आव्हाड यांचा टोला

राज यांची उत्तरसभा नव्हती तर ती उत्तरपूजा होती. ज्याची प्रतिष्ठापना केली जाते, त्याचीच उत्तरपूजेनंतर विसर्जन केले जाते

jitendra awhad
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (संग्रहीत छायाचित्र)

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना  इंधनाचे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव दिसत नाहीत आणि त्याच्यावर ते काहीच बोलणार नाहीत, असा टोला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

राज यांना दंगल घडवून बहुजन समाजातील मुलांना कारागृहात पाठवायचे असेल तर त्याला कोण काय करणार? कोणत्याही दंगलीत एखाद्या मोठय़ा नेत्याचे घर जळाल्याचा दाखला इतिहासात नाही. दंगा करणाऱ्यांच्या जामिनासाठी कोणताही नेता येत नाही आणि पुढे त्यांना विचारतही नाही. केवळ आईबापच येतात. त्यामुळे मुलांनीही त्याचा विचार करावा, असे आवाहन केले.

सभेमुळे ठाणेकर चार तासांहून अधिक काळ वाहतूक को़ंडीत अडकून पडले होते. त्यामुळे ते किती महान आहेत हे दिसूनच येते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

राज यांची उत्तरसभा नव्हती तर ती उत्तरपूजा होती. ज्याची प्रतिष्ठापना केली जाते, त्याचीच उत्तरपूजेनंतर विसर्जन केले जाते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.  राज हे भोंग्यावर बोलतात. त्यांनी जिथे सभा घेतली. त्या ठिकाणी दोन शाळा आहेत. शाळांच्या आजूबाजूला ध्वनिक्षेपक लावू नयेत, असा सर्वोच्च न्यायालयाचा नियम आहे. हे राज यांच्या कार्यकर्त्यांना माहीत नव्हते का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. २००९ पासून मी मुंब्य्राचे प्रतिनिधित्व करीत आहे.

केवळ दोन वेळा तिथे अतिरेक्यांच्या रेकॉर्डवरील लोक सापडले. तेदेखील बाहेरून आलेले भाडेकरू होते. ते स्थानिक नव्हते. मुंब्य्रात आता एवढा बदल झाला आहे की, मुंब्य्रात आता लोक वेगळा विचार करीतच नाहीत, असे आव्हाड यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray silent on inflation says ncp jitendra awhad zws

ताज्या बातम्या