ठाणे : गणेशोत्सवाच्या काळात दंगली घडविण्याची भीती असून, हिंदू आणि मुस्लिम समाजातील सुजाण नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात केले. समाजमाध्यमांद्वारे वातावरण तापवून समाजात राग निर्माण केला जात आहे. जाती-धर्माच्या वादात नागरिकांना अडकवून ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी रविवारी ठाणे शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना गडकरी रंगायतन येथे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांसह बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, शेतकरी आत्महत्या आणि भाषेच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. देशात सध्या सर्वत्र धर्माची झिंग निर्माण झाली आहे. देवावरील श्रद्धा आणि धर्माचा अभिमान समजू शकतो; मात्र धर्माची झिंग असता कामा नये. धर्माचा अभिमान असावा, धर्मांधता नको. गणेशोत्सवाच्या काळात दंगली घडवून आणल्या जाऊ शकतात.
नागरिक त्यात अडकून पडतील आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल. मुंबईत एक-दोन घटना घडल्या असून, ही सुरुवात असल्याची भीती आहे. त्यामुळे सुजाण हिंदू आणि मुस्लिमांनी सतर्क राहावे, असे राज ठाकरे म्हणाले. देशातील बेरोजगारी वाढत असताना त्याकडे दिल्लीतील माध्यमांकडून दुर्लक्ष केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. देशातील परिस्थिती गंभीर असून, सरकारकडून सांगितल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर अंधपणे विश्वास ठेवणाऱ्यांना वस्तुस्थितीची माहिती नसल्याचेही ते म्हणाले.
मोदींच्या छायाचित्रावरून टीका
– काही दिवसांपूर्वी सरकारी कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरून झालेल्या वादाचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या रांगेत दुसरे कोणी बसू शकत नाही. सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचे छायाचित्र असावे; मात्र ते दुसऱ्या भिंतीवर असावे, या रांगेत नको, असे ते म्हणाले.
”जीडीपी ७.८ टक्के असेल तर परदेशात का जाऊ नये?”
– दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात जाऊ नका, असे परदेशातूनच आवाहन केले. जीडीपी ७.८ टक्के असल्याचे सांगितले जात असेल, तर परदेशात का जाऊ नये आणि सोने का खरेदी करू नये, असा सवाल त्यांनी केला. आज ‘जेन झी’ रस्त्यावर आले आहेत, उद्या संपूर्ण देश रस्त्यावर येईल, असा इशाराही त्यांनी दिला. २०२१ ते २०२६ या कालावधीत ५०३ कंपन्यांनी भारतातील कामकाज बंद केल्याचा केंद्र सरकारचा अहवाल असल्याचे त्यांनी सांगितले.
”भाषेच्या वादात अडकविण्याचा प्रयत्न”
– अनेक अमराठी नागरिकांना मराठी भाषेविषयी बोलायला लावले जात आहे. त्यातून मराठी भाषिकांना भाषेच्या वादात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. नवी मुंबईत येत्या काही दिवसांत हिंदी संमेलन होणार असून, त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. हिंदी संमेलनाला उपस्थित राहूनही अमित शहा यांचे हिंदी चांगले होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
विद्यार्थी परदेशात, शेतकरी आत्महत्या करत आहेत
– देशातील लाखो विद्यार्थी अमेरिका, युरोप आणि रशियात शिक्षण घेण्यासाठी जात असून, त्यातील अनेकजण तेथेच स्थायिक होत आहेत. चीनमधून २५ वर्षांपूर्वी परदेशात गेलेल्या दोन टक्के विद्यार्थ्यांपैकी अनेकजण परत येत होते; आता ९६ टक्के विद्यार्थी परत येत असल्याचा दावा त्यांनी केला. २०१८ ते २०२६ या कालावधीत भारतात २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याची क्षमता असलेले सुमारे १३ हजार उद्योगपती परदेशात गेल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.
