ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे रविवारी ठाणे शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यासाठी गडकरी रंगायतन येथे उपस्थित राहणार आहेत. सण-उत्सवांच्या काळात ध्वनिक्षेपक आणि डीजेच्या मोठ्या आवाजाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यावेळी ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सण-उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक वाजविण्याविरोधात आंदोलन सुरू आहे. पुण्यात ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठविणारे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्याची घटनाही घडली होती. यानंतर पुणेकरांनी एकत्र येत डीजेबंदीची मागणी केली. दरम्यान, ठाण्यातील प्रसिद्ध डॉक्टर महेश बेडेकर यांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी २०१० मध्येच न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्यानंतर २०१२ आणि २०१६ मध्ये न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देत शहरातील शांतता क्षेत्र निश्चित केले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मेळाव्याकडे विशेष लक्ष लागले आहे. मेळाव्यात ते डीजेच्या दणदणाटासह ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर पदाधिकाऱ्यांना काय सूचना करतात, याची उत्सुकता मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाणे शहरातील विविध भागांत मनसेचे झेंडे आणि फलक लावण्यात आले आहेत. मेळाव्यासाठी सकाळपासूनच शहरातील विविध भागांतून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गडकरी रंगायतन परिसरात जमण्यास सुरुवात झाली होती. राज ठाकरे यांची भूमिका ऐकण्यासाठी अनेक पदाधिकारी उत्सुक असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.