ठाणे : प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक मिळणारच, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना राज्यातील पक्षफोडाफोडीच्या राजकारणावर प्रतिक्रीया व्यक्त केली. लोकशाहीत मतदारांनी मतदान करून निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी पक्षांतर करणे ही मतदारांच्या विश्वासाची फसवणूक असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
ठाणे येथील मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टिका केली. आपण काय करतोय, कुठ पर्यंत जातोय, याला काही मर्यादा आहेत का नाही, प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही विकले जाणाऱ्यांचा आहे, देहविक्रीला हे तयार असतील तर गिऱ्हाईक आहेतच, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. लोकशाहीत लोकांनी उन्हातान्हात उभे राहून मतदान करायचे आणि त्यानंतर अशी फोडाफोडी पाहायची, हे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
इतिहासात ज्या-ज्या वेळी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांच्याच पक्षात नवे विरोधक निर्माण झाले. आणीबाणीच्या काळातही हेच घडले होते. समोरचे विरोधक संपवले की विरोधक स्वत:च्या पक्षातच तयार होतात. हा जगाचा इतिहास आहे. ज्या ज्यावेळी सत्ताधाऱ्यांनी आपला विरोधक संपवला आहे. तेव्हा त्यांच्यातच विरोधक आणि दुश्मन तयार झालेले आहेत आणि त्यांनी त्यांनाच संपवले आहे. ही प्रक्रिया भाजपमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे बाहेरील विरोधी पक्ष संपविण्याच्या राजकारणापेक्षा भाजपने स्वत:च्या पक्षात निर्माण होत असलेल्या विरोधकांकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
भाजप पत्त्याचा बंगला
भाजप हा पत्त्यांच्या बंगल्यासारखा आहे. त्याचा खालचा पत्ता नरेंद्र मोदी आहेत. तो एकदा सरकला की संपूर्ण बंगला कोसळेल. आज जे काही टिकून आहे, ते मोदी यांच्यामुळे आहे. इतर कुणावर ही रचना उभी नाही, असे त्यांनी सांगितले. उध्दव ठाकरेच्या सेनेचे खासदार फुटले, तर ते थेट भाजपमध्ये का गेले नाहीत, तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटल्यानंतर स्वतंत्र गट का तयार करण्यात आला, विरोधक संपविण्याच्या या राजकारणाचे परिणाम भविष्यात महाराष्ट्रासह देशभरात दिसतील. हे सगळे एका विशिष्ट राजकीय रणनीतीचा भाग आहे, असेही ते म्हणाले.
हा विकास नव्हे
शहरे कशी उभी राहावीत आणि राहण्यायोग्य कशी बनावीत, याकडे कुणाचेच लक्ष नाही. फक्त बांधकाम, पैसा, राजकारण आणि सत्ता एवढ्यापुरताच विकास मर्यादित राहिला आहे. केवळ रस्ते आणि पूल उभारणे म्हणजे विकास नव्हे. शहरांची वाढ आणि नियोजन यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. मतदार यादीतील बदल ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. दरवर्षी नवीन मतदार यादीत समाविष्ट होतात, अनेकजण स्थलांतर करतात, त्यामुळे ही प्रक्रिया थांबवून चालणार नाही. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये या प्रक्रियेचा मोठा परिणाम दिसून आला, असे ते म्हणाले.
