ठाणे : आपण सणांमध्ये डॉल्बी, डीजे का लावताय, सण पारंपारिक पद्धतीने का साजरा होत नाही. उत्तरेतील संस्कृती महाराष्ट्रात का आणत आहोत, गोविंदाच्या मंचावर नाच केले जातात. हा प्रकार उत्तर भारतातील आहे. आपण कोण आहोत, महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. हा महाराष्ट्र उत्तरेचे का अनुकरण करत आहे. सण कसे साजरे करावे यासाठी काही नियमावली असली पाहिजे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

सण-उत्सवांच्या काळात डीजे आणि डॉल्बीच्या मोठ्या आवाजाला विरोध होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सणांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये पदाधिकारी मेळाव्यात भूमिका मांडली. आपण सणांमध्ये डॉल्बी आणि डीजे का लावत आहोत? सण पारंपरिक पद्धतीने का साजरे होत नाहीत?’ असा सवाल राज ठाकरे यांनी केला. सण साजरे करण्याची पद्धत बदलत चालली असून, त्यामध्ये इतर राज्यांतील संस्कृतीचे अनुकरण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डीजेबंदी विषयी पुण्यात वाद सुरु आहेत. नागपूरात डीजे बंद आहे. परंतु महाराष्ट्रात सुरु असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

शाळेबाहेरील पान टपरीवर अमली पदार्थ मिळत आहेत.जंगल तोड होत आहे, जमीनी घेतल्या जात आहेत. ज्यांच्या जमीनी गेल्यात त्यांना नोकऱ्या मिळत नाही. भाजपच्या लोकांना देशाची परिस्थिती माहित आहे. परंतु ते बोलू शकत नाहीत असेही राज ठाकरे म्हणाले. धर्मांधपणा खड्ड्यातच घेऊन जाणार. आपला देश मागे जात आहे अशी टीका देखील त्यांनी केली.