ठाणे : ठाणे शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी गडकरी रंगायतन येथे आले होते. राज ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर एका कार्यकर्त्याने अचानक ‘इन्कलाब जिंदाबाद’ची घोषणा दिली. मंचावरून निघून जाणारे राज ठाकरे पुन्हा पोडियमजवळ आले आणि त्यांनी कार्यकर्त्याला काय सांगितले वाचा..
ठाणे शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली. बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, शेतकरी आत्महत्या आणि भाषेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. ‘महाराष्ट्राने देशाला काय दिले, आपला इतिहास काय आहे, याचा विचार करण्याची गरज आहे,’ असे ते म्हणाले. सण-उत्सवांमधील वाढत्या ध्वनिप्रदूषणावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले.
सण कसे साजरे करावेत, यासाठी काही नियमावली असली पाहिजे. लेझरच्या प्रकाशामुळे अनेकांच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे, तर डीजे आणि डॉल्बीच्या दणदणाटामुळे हृदयविकाराचा त्रास असलेल्या व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला उत्सव आपण कुठे आणून ठेवला आहे, असा सवाल त्यांनी केला. पुण्यात डीजे वाजविण्यावरून वाद सुरू आहेत, तर नागपूरमध्ये डीजेवर बंदी आहे. महाराष्ट्रात डीजेवर बंदी नाही. कायद्याने डीजेवर बंदी आणता येत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मग नागपूरमध्ये डीजे बंदी कशी झाली, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, राज ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर राष्ट्रगीत झाले. राष्ट्रगीतानंतर राज ठाकरे व्यासपीठावरून निघून जात होते. त्याचवेळी एका मनसे कार्यकर्त्याने अचानक ‘इनक्लाब जिंदाबाद’ची घोषणा देण्यास सुरुवात केली. राज ठाकरे पुन्हा माईकजवळ आले आणि ‘इन्कलाब जिंदाबाद’ची घोषणा कोणी दिली, अशी विचारणा केली. त्यावर योगेश भुवेकर या कार्यकर्त्याने आपण घोषणा दिल्याचे सांगितले. यावर राज ठाकरे यांनी, ‘ही घोषणा द्यायची बरका… कारण ही घोषणा भगतसिंग यांची आहे,’ असे म्हणाले. त्यानंतर उपस्थित इतर मनसे कार्यकर्त्यांनीही ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
