ठाणे- हिंदी सक्तीचा शासननिर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहे. ५ जुलै, उद्या होणाऱ्या या विजयी मेळाव्याचे ठाकरे ब्रँडकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे शहरात दमदार तयारी सुरु आहे. मनसे आणि शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून शहरात बॅनरबाजीच्या माध्यमातून ‘महाराष्ट्रातील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा’ असे आवाहन जनतेला केले जात आहे.

हिंदी सक्तीच्या शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी दोन्ही ठाकरे बंधू आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शासनाने हा निर्णय रद्द करावा यासाठी या दोन्ही बंधूंनी एकत्र मोर्चाची हाक दिली होती. या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार होते. परंतु, महाराष्ट्रातील जनतेचा रोष आणि विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. यापार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र विजयी मेळावा घेण्याचे जाहीर केले. हा विजयी मेळावा ५ जुलै, उद्या एन. एस. सी. आय. डोम वरळी येथे होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेळाव्यात तब्बल १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र एका व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा, असे आवाहन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जनतेला केले जात आहे.

– ठाकरे ब्रँडकडून विजयी मेळाव्याची तयारी

  • ठाणे शहरातून मोठ्या संख्येने मनसैनिक आणि शिवसैनिक (उबाठा) या मेळाव्यात सहभागी व्हावेत यासाठी नाव नोंदणी केली जात आहे.
  • कार्यकर्त्यांसाठी ठाण्यातून बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • वागळे इस्टेट भागातील सावरकर नगर भागातील मनसे तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाचे जे कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असतील त्यांनी शुक्रवार, आज सायंकाळपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन सावरकर नगरचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे विभागप्रमुख राजीव शिरोडकर आणि महिला शहर संघटक प्रमिला भांगे यांनी केले आहे. शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ७:३० वाजता सावरकर नगरमधील ज्ञानोदय शाळा येथून बस सोडली जाणार आहे, असे राजीव शिरोडकर यांनी सांगितले.