मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा दावा करणाऱ्या तसेच परप्रांतीयांविरोधात आंदोलन करत राजकारणाची सुरुवात केलेल्या मनसेने आता हिंदूत्वाचा मुद्दा जवळ केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मंगळवारी होणाऱ्या ठाण्यातील सभेपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील पाचपाखाडी भागात ‘मुंबई मे बैठा हिंदूओ का राजा, अपनी हिफाजत चाहिए तो मनसे में आजा’ अशा आशयाचे फलक उभारले आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने आता हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर उडी घेतल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. असं असतानाच आता मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेसाठी उत्तर प्रदेशमधून काही लोक विमानाने येणार असल्याची माहिती दिलीय.

नक्की वाचा >> ‘रिंकिया के पापा’ गाण्याने स्वागत’, ‘क्या नेता बनेगा रे तुम लोग’ ते ‘महाराष्ट्र धर्म सोडला का?’; ठाण्यातील सभेआधीच राज ठाकरे ट्रोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या सभेची जोरदार तयारी ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. सुमारे ४० हजारहून अधिकचा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता मनसेकडून वर्तविली जात आहे. तसेच मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या शाब्दीक वादानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात ‘उत्तरसभा’ अशा आशयाचे फलक उभारले आहे. त्यामुळे राज ठाकरे सभेत काय बोलणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. या सभेच्या तयारीसंदर्भात सभास्थळावरुन बोलताना अविनाश जाधव यांनी तयारी पूर्ण झाली असून या सभेसाठी उत्तर प्रदेश, बिहारसहीत जम्मू काश्मीरमधूनही लोक येणार असल्याचं म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: …अन् वसंत मोरे राज ठाकरेंच्या पाया पडले; ‘शिवतीर्थ’वरील बैठकीमधील Inside Photos पाहिलेत का?

“दोन तारखेच्या सभेनंतर लोकांकडून प्रश्न आले, राष्ट्रवादीकडून प्रश्न आले. त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं काम हे आमचं आहे. जे काही प्रश्न आलेत त्याला राज ठाकरे सभेतून उत्तर देतील,” असं या सभेसंदर्भात बोलताना अविनाश जाधव यांनी म्हटलंय. तसेच पुढे बोलताना त्यांनी या सभेबद्दल सगळीकडेच उत्सुकता असल्याचं सांगितलं. “माझे काही मित्र आहेत. त्यापैकी एका मित्राने मला फोन केलेला. तेव्हा त्याने सांगितले की त्याचे काही उत्तर प्रदेशमधील मित्र आहेत जे विमानाने दुपारी यासभेसाठी येणार आहेत. त्याने मला फक्त सांगितलं की दादा पास ठेवा,” असंही अविनाश जाधव म्हणाले.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: राज ठाकरे Vs पवार फॅमेली.. १० दिवसांमध्ये कोण काय बोललं? जातीयवाद, २१०० कोटींचा घोटाळा, मोदींबद्दलची भूमिका अन्…

पुढे बोलताना, “या सभेबद्दल अशी आतुरता असेल लोकांमध्येसभेसाठी तर तुम्ही समजू शकता की महाराष्ट्राच नव्हे तर युपी, बिहार, काश्मीर सगळीकडूनच लोक येणार आहेत. एवढी मोठी सभा याच्यापुढे घेण्याची ताकद कोणत्या नेत्यात आहे असं मला वाटत नाही. ही ऐतिहासिक सभा असून सर्व ठाणेकरांनी येथे उपस्थित रहावे,” असंही अविनाश जाधव म्हणालेत.