ठाणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दादर येथील‘ शिवाजी पार्क’वर विजयी जल्लोष साजरा केला जाणार आहे. या जल्लोषासाठी ठाण्याहून शेकडो शिवसैनिक (ठाकरे) आणि मनसैनिकांनी रेल्वेने प्रवास करत शिवाजी पार्क गाठण्यास सुरुवात केली. ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही ठाणे स्थानकातून एकत्र प्रवास करत मुंबई गाठली. यावेळी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दिल्ली येथील जंतरमंतर येथे तरुणांचे आणि विद्यार्थांचे आंदोलन सुरु होते. ‘सीजेपी’ने आयोजित केलेल्या या आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तरुणांसमोर झुकावे लागल्याची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि दिल्ली पोलिसांच्या लाठीमार विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मोर्चा पूर्वीच प्रधान यांचा राजीनामा झाल्याने आता विजयी जल्लोष साजरा केला जाणार आहे. शिवाजी पार्क येथे जाण्यासाठी सकाळपासून तरुणांची गर्दी झाली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी रेल्वे स्थानक परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी एकत्र रेल्वे प्रवास केल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. रेल्वेने प्रवास करत असताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.