ठाणे : ठाणे लोकसभेचे माजी खासदार तथा शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते राजन विचारे यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा वापर करून सायबर गुन्हेगारांकडून बनावट खाते तयार करण्यात आले असून, त्याद्वारे नागरिकांना फसवणुकीचे संदेश पाठविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदेशांना प्रतिसाद देऊ नये किंवा कोणताही मोबाईल क्रमांक अथवा वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन विचारे यांनी नागरिकांना केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाने आणि छायाचित्राचा वापर करून फेसबुक या समाजमाध्यमावर बनावट खाते तयार करण्यात आले आहे. या खात्याच्या माध्यमातून अनेक नागरिकांना वैयक्तिक संदेश पाठवून त्यांच्याशी संवाद साधण्याचा तसेच मोबाईल क्रमांक आणि अन्य माहिती मागण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित संदेशांना प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच राजन विचारे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या नावाने किंवा छायाचित्राचा वापर करून पाठविण्यात येणाऱ्या कोणत्याही संदेशांना प्रतिसाद देऊ नये असे राजन विचारे यांनी स्पष्ट केले. राजन विचारे यांनी इन्स्टाग्राम खात्यावर याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी पुढील संदेश प्रसारित केला आहे.

‘सर्वांना नम्र विनंती आहे की, सध्या सोशल मीडियावर (फेसबुक-मॅसेंजर) माझ्या नावाने (राजन विचारे – Rajen Vichare) आणि माझ्या छायाचित्राचा वापर करून एक बनावट खाते तयार करण्यात आले आहे.या अकाउंटवरून लोकांना ”फ्री स्टॉक डिस्कशन ग्रुप” मध्ये सामील होण्यासाठी संदेश पाठवले जात आहेत. तसेच व्हॉट्सॲप नंबर मागितला जात आहे आणि काही लिंक्स शेअर केल्या जात आहेत. परंतु हे खाते माझे नाही. त्यामुळे कृपया या खात्यावरून येणाऱ्या कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ नका, स्वतःचा नंबर शेअर करू नका आणि दिलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. हा पूर्णपणे फसवणुकीचा प्रकार आहे. कृपया या अकाउंटवरून येणाऱ्या कोणत्याही संदेशाला उत्तर देऊ नका. दिलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तुमचा वैयक्तिक नंबर शेअर करू नका आणि हे अकाउंट रिपोर्ट करा तसेच ब्लॉक करा. सर्वांनी हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा’ असे राजन विचारे यांनी म्हटले आहे.