ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी समाजमाध्यमावर एक चित्रफित प्रसारित केली आहे. या चित्रफितीत त्यांनी शिंदे गटावर थेट निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे खासदार राजन विचारे हेदेखील आनंद दिघे यांचे शिष्य मानले जातात. विचारे यांची ही चित्रफित सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरतेय. या चित्रफितीत आनंद दिघे यांची दुर्मिळ छायाचित्रं आणि काही व्हिडीओंचा सामावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>> पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यावेळी मी…”!

साहेबांनी शाखेलाच आपले घर समजले

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी शिवसेनेची मोठी फळी ठाण्यात उभी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांसारखे अनेक नेते ठाण्यात दिघे यांच्या सहवासामुळे राजकारणात पुढे आले. दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यात शिवसेनेकडून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. खासदार राजन विचारे हे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. शुक्रवारी राजन विचारे यांनी समाजमाध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली. या चित्रफीत त्यांनी म्हटले आहे की, ‘साहेबांनी शाखेलाच आपले घर माणून शिवसेनेला आपले कुटुंब केले होते. काट्यांतून फुले वेचावी तशी लोकांचे दु:ख त्यांनी वेचले होते. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त प्रेम त्यांनी कार्यकर्त्यांवर केले.’

हेही वाचा >>>> आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त प्रसाद ओकने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला “धर्मवीर…”

तो आवाज गर्जत राहिलाच पाहिजे

‘जेव्हा गद्दारीची कीड संघटनेला लागली, तेव्हा ती कीड नष्ट करून नगरसेवकांचे राजीनामे घेऊन दिघे साहेबांनी राजकीय इतिहास रचला. जेव्हा आपल्या दिघे साहेबांना जेरबंद केलं, तेव्हा संपूर्ण ठाणं कुटुंबासारखं एकत्र आलं. कारण तो आवाज होता गद्दारीच्या विरोधाचा. तो आवाज होता ठाण्याच्या शिवसेनेचा. नि:स्वार्थी राजकारणाचा आणि आजही तो आवाज गर्जत राहिलाच पाहिजे, कारण ही आपल्या धर्मवीरांची शिकवण आहे,’असे या चित्रफितीत म्हटले आहे.

हेही वाचा >>>> Pariksha Pe Charcha: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद; ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर नागपुरातून फडणवीसांचीही ऑनलाईन ‘हजेरी’!

आता त्यांना गुरुदक्षिणा देण्याची वेळ

‘आता दिघे साहेब फक्त आठवणीत ठेऊन चालणार नाही. तर त्यांचे विचार आपल्या रक्तात जिवंत असले पाहिजे, तेव्हाच दिघे साहेबांच्या त्यागाचे चीज होईल,’ असा उल्लेखही चित्रफितीत करण्यात आला आहे. ‘आता त्यांना गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली आहे. सगळ्यांनी पुन्हा एकत्र येऊन आपलं कुटुंब सांभाळुया. बाळासाहेबांचा ‘आनंद’ म्हणजेच आपल्या ठाण्याची शिवसेना. पुन्हा एकदा ठाण्यावर आपल्या शिवसेनेचा भगवा फडकवुया. गद्दारीला ठेचत शिवसेनेच्या निष्ठेचा विजय करूया आणि हीच शिवसैनिकांकडून दिघे साहेबांना दिलेली छोटीशी गुरूदक्षिणा असेल,’ असेही या चित्रफितीत म्हणण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajan vichare publish video slams eknath shinde and rebel groups on occasion of anand dighe birth anniversary prd
First published on: 27-01-2023 at 14:42 IST