ठाणे : तुम्ही आणखी मर्डर होण्याची वाट बघताय का? पोलीस डिपार्टमेंट काय काम करतय.. असा प्रश्न उपस्थित करत राजन विचारे थेट ठाणे पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त तसेच पूर्णेकर हत्याकांड प्रकरणातील विशेष तपास पथकाचे मार्गदर्शक पंजाबराव उगले यांच्यावर भडकले. हा सर्व प्रकार ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या दालनामध्येच घडला. याचे चित्रीकरण सर्वत्र प्रसारित झाले आहे. घोडबंदर मार्गावरील मानपाडा परिसरात २९ सप्टेंबरला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात घुसून पाच जणांनी निर्घृण हत्या केली होती.
आज, २९ ऑक्टोबरला प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना उलटला. परंतु या प्रकरणात मुख्य सूत्रधारांना अटक झाली नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाकडून केला जातो. पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली असली तरीही त्यांनी हत्या का केली याबाबतचा उलगडा पोलिसांना करणे शक्य झाले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गुरुवारी सकाळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार राजन विचारे, अविनाश जाधव, केदार दिघे यांच्यासह अनेक पदाधिकारी गेले होते.
यावेळी दालनामध्ये सह पोलीस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे सह आयुक्त पंजाबराव उगले उपस्थित होते. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे. परंतु महिना झाल्यावरही याप्रकरणाचा तपास अपूर्ण आहे. असे असतानाच, काही समाजकंटकांनी रास्तोरोको आंदोलना दरम्यान दगडफेक केली होती. ही दगडफेक राजेंद्र शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. तसेच, त्याची चित्रफीत दाखविण्यात आली.
तर, शिंदे गटाच्या युवासेनेच्या एका पदाधिकाऱ्याने प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर यांच्या छायाचित्रावर फुल्ली मारल्याची पोस्ट प्रसारित केली होती. या पोस्टवर त्यांच्याविषयी काही मजकूर लिहीला होता. या पोस्टचे छायाचित्र देखील विचारे घेऊन गेले होते. पोलिसांसोबत चर्चा सुरु असतानाच, विचारे यांचा राग अनावर झाला. त्यांनी संतापून थेट उगले यांना तुम्ही आणखी मर्डर होण्याची वाट बघताय का? पोलीस डिपार्टमेंट काय काम करतय.. असा प्रश्न केला. या प्रकारानंतर दालनात एकच शांतता पसरली. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी त्यांना शांत राहण्याची विनंती केली. त्यानंतर काही वेळाने विचारे यांचा राग शांत झाला.
