scorecardresearch

Premium

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणले होते प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व; संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव यांचे प्रतिपादन

सामाजिक सुधारणा, उद्योग आदींबाबत निर्णय घेतानाही त्याचा पाया प्राथमिक शिक्षणाच्या सबलीकरणात शोधण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यात केला, डॉ. रमेश जाधव यांनी ‘विचारमंथन व्याख्यानमाले’चे चौथे पुष्प गुंफताना केले.

Dr. Ramesh Jadhav
डॉ. रमेश जाधव

ठाणे : व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये प्राथमिक शिक्षणाचे स्थान मोलाचे असते. हा विचार राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यातून पुढे नेला. सामाजिक सुधारणा, उद्योग आदींबाबत निर्णय घेतानाही त्याचा पाया प्राथमिक शिक्षणाच्या सबलीकरणात शोधण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यात केला, असे प्रतिपादन संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव यांनी ‘विचारमंथन व्याख्यानमाले’चे चौथे पुष्प गुंफताना केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४९व्या जयंती दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेतर्फे सोमवार, २६ जून रोजी काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रा. डॉ. रमेश जाधव यांचे, ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य आणि विचार’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाहू महाराजांनी गादीवर येण्यापूर्वी संपूर्ण संस्थानाचा दौरा केला. त्यात त्यांना गावांमध्ये प्राथमिक शाळांचा अभाव जाणवला. काही ठिकाणी शाळा होती पण, तिथे शाळेच्या वास्तूची पडझड झाली होती. काही ठिकाणी शाळेत शिक्षक नव्हते. ही सर्व परिस्थिती पाहिल्यावर शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा आदेश काढून त्यासाठी आर्थिक तजवीज सुरू केली, असे डॉ. रमेश जाधव यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar comment wagh nakh
छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण – सुधीर मुनगंटीवार
Mahatma Gandhi Jayanti Bapu Educational Background Why He Was Criticized For Going London From Porbunder after marriage
महात्मा गांधी यांचे शिक्षण किती होते? पोरबंदर ते लंडन कसा झाला बापूंचा प्रवास..
MS Swaminathan
एम. एस. स्वामीनाथन यांचे कृषीसंशोधन क्षेत्रातील योगदान काय? वाचा सविस्तर…
funds for nagpur zilla parishad stopped
लोकजागर : अनाकलनीय ‘अडवणूक’

महाराजांनी कारभार हाती घेतला, तेव्हा संस्थानात २२४ शाळा होत्या आणि १५ हजार विद्यार्थी होते. त्यांच्यावर संस्थानाच्या एकूण उत्पन्नापैकी ३.५ टक्के खर्च होत होता. तो शाहू महाराजांनी वाढवला. खर्चासाठी शाळांना धार्मिक संस्थांच्या उत्पन्नाशी जोडून दिले. १९२२ मध्ये शाळांची संख्या ४०० च्या पुढे गेली. २२ हजार विद्यार्थी झाले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केल्यावर कोल्हापूर संस्थानात शिक्षणाचा प्रसार वेगाने झाला, असे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले. महात्मा जोतीराव फुले यांचा शिक्षणाचा विचार, सत्यशोधक चळवळ शाहू महाराजांनी पुढे नेली. प्राथमिक शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षित करण्याची मोहिम शाहू महाराजांनी हाती घेतली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यात आले. मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती देण्यास सुरूवात केली. अस्पृश्यता निवारणासाठी घेतलेल्या निर्णयानुसार, शाळेबाहेर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र बसण्याची व्यवस्था शाहू महाराजांनी केली. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, त्यात अडसर आणू नये, यासाठी विद्यार्थी गैरहजर राहिला तर त्यांच्या पालकांना दंड करण्यास सुरूवात केली, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

प्रामाणिकपणे शिकविणाऱ्या शिक्षकांवर त्यांचे विशेष लक्ष असे. शिक्षकाने व्यवसायाशी प्रामाणिक असावे, या व्यवसायाचा मानसन्मान राखला जावा, यावर शाहू महाराजांचा कटाक्ष होता. संस्थानातील शिक्षणाची व्यवस्था उभी करतानाच शाहू महाराजांनी संस्थानाबाहेर, पुणे, नाशिक, पंढरपूर, मुंबई आदी भागातील संस्थाना आर्थिक मदत केली. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शाहू महाराजांनी सुरू केलेली वसतीगृहांची चळवळ हा तर त्यांच्या कार्याचा फार मोठा पैलू असल्याचे डॉ. जाधव यांनी नमूद केले. शाहू महाराजांचे शिक्षणासाठीचे योगदान, शाळांची उभारणी, अस्पृश्यता निवारणासाठी उचलेली पावले यांच्याविषयी डॉ. जाधव यांनी व्याख्यानात अनेक उदाहरणे दिली. अल्पायुष्यातही शाहू महाराजांनी केलेल्या क्रांतीकारी कार्याचा यथोचित गौरव डॉ. जाधव यांच्या व्याख्यानात होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajarshi chhatrapati shahu maharaj knew the importance of primary education dr ramesh jadhav ysh

First published on: 28-06-2023 at 17:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×