ठाणे : ठाण्यात भाजप शिवसेना (शिंदे गट) युतीमुळे आता अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना उमेदवारी मिळाली नाही. यामध्ये आनंद दिघे यांच्यासोबत विविध आंदोलनांमध्ये सहभागी असणारे त्यांचे शिष्य माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांचाही सामावेश आहे. शिंदे गटाने येथील जागा भाजपला दिली आहे. साप्ते यांना उमेदावारी मिळाली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी शेकडो शिवसैनिकांना एकत्र करून आनंद दिघे यांचे स्मृतीस्थळ गाठले. तसेच, उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांनी श्रीकांत शिंदे यांना वेठीस धरले, ब्लॅकमेल करण्याचा प्रकार केला असा आरोप साप्ते यांनी भाजपवर नाव न घेता केला.
ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा शहरातील प्रभाग क्रमांक २५ मधून राजेंद्र साप्ते हे निवडून येत होते. मागील अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. तसेच, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचाही त्यांना सहवास लाभला होता. त्यांनी ठाणे महापालिकेत उपमहापौर पद देखील भूषविले होते. उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साथ सोडल्यानंतर साप्ते यांनी शिंदे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. यावेळी युतीतून उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना होती. परंतु कळवा भागातून भाजपने देखील उमेदवारी मागण्यास सुरुवात केली. प्रभागातील एक जागा भाजपला सुटल्याने साप्ते यांची उमदेवारी कापली गेली.
यानंतर संतापलेल्या साप्ते यांनी गुरुवारी कळवा ते ठाण्यातील आनंद दिघे यांचे ठाण्यातील स्मृतीस्थळ पर्यंत शिवसैनिकांना घेऊन पायी आले. सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आनंद दिघे यांचे छायाचित्र होते. त्यामध्ये ‘साहेब, निष्ठावंताची हार झाली’ असा उल्लेख होता.
याबाबत राजेंद्र साप्ते यांना माध्यमांनी विचारले असता, शिवसेनेचे पॅनल असतानाही भाजपने तेथे जागा मागितली. भाजपचे सर्व कार्यकर्ते संबंधित उमेदवारावर नाराज आहेत. माझा एबी अर्ज तयार होता असे असतानाही त्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना त्यांनी वेठीस धरले. ब्लॅकमेल करण्याचा प्रकार झाला. मी कोणत्याही पक्षात गेलो असलो तरी मला उमेदवारी मिळाली असती. पण मी शिवसैनिक आहे असेही ते म्हणाले.
