ठाणे : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सुमारे आठ तास चौकशी करून त्यांना सोडून दिले. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या दिवसापासूनच पूर्णेकर कुटुंबीयांकडून राजेंद्र शिंदे यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता. तसेच, या प्रकरणातील पुरवणी जबाबातही मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे घेण्यात आली होती. अखेर हत्याकांडाच्या दोन आठवड्यांनंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. दरम्यान, या हत्याकांडाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा राजेंद्र शिंदे यांनी चौकशीदरम्यान करीत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात घुसून पाच जणांनी निर्घृण हत्या केली होती. हल्लेखोरांनी दोन बंदुकांमधून गोळ्या झाडण्यासह तीन चॉपरनेही वार केले होते. या हत्याकांडामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. प्रदीप यांचे बंधू तथा माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर आणि प्रदीप यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी या हत्याप्रकरणी मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले होते. या दोघांची नावे प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) समाविष्ट केल्याशिवाय प्रदीप पूर्णेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका पूर्णेकर कुटुंबीयांनी घेतली होती. या प्रकरणावरून आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते.

त्यानंतर पोलिसांनी पुरवणी जबाबात मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या नावांचा समावेश केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांचे विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. हत्याप्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या सुभाष शिंदे उर्फ पप्या शिंदे, निखील यादव, नितेश पवार, संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंह या पाच जणांना अटक केली होती. याशिवाय एका तरुणीसह बांधकाम व्यावसायिकांचीही चौकशी करण्यात आली होती. मात्र, शिंदे दाम्पत्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. अखेर मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

सुरुवातीला पप्या शिंदे याला बोलावून राजेंद्र शिंदे यांच्या समोर त्यांची चौकशी पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी केली. त्यांनतर सायंकाळी निखिल आणि नितेश या दोघांची राजेंद्र शिंदे यांच्या सोमोर चौकशी झाली.यामध्ये काहीही संबंध नसल्याचे राजेंद्र शिंदे यांनी पोलिसांना सांगितले. सुमारे आठ तास त्यांची चौकशी झाली. सुभाष शिंदे उर्फ पप्या, निखील यादव आणि नितेश पवार या तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपणार होती. त्यामुळे त्यांना दुपारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. सुभाष शिंदे याच्या अटकेनंतर १४ दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्याने पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, निखील यादव आणि नितेश पवार यांना पोलीस कोठडीत १२ दिवस पूर्ण झाले आहेत. या दोघांची राजेंद्र शिंदे याच्यासमोर चौकशी करायची आहे. तसेच, त्यांनी बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण कुठे घेतले, बंदूक आणि तीन चॉपर कुठे लपवून ठेवले आहेत, याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता या दोघांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली. मात्र, निखील आणि नितेश यांच्या वकिलांनी त्यांच्या अशिलांना पुरेशी पोलीस कोठडी मिळाल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निखील यादव आणि नितेश पवार यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. – अमरसिंग जाधव, गुन्हे अन्वेशन शाखा, उपायुक्त, ठाणे पोलीस पोलीस चौकशीत सहकार्य करत आहे. – राजेंद्र शिंदे.